
सामना प्रतिनिधी । कल्याण
कर्जमाफीसह शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱयांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपावर सहाव्या दिवशीही ठोस तोडगा निघाला नाही. याचा जबरदस्त फटका भाज्यांच्या दरांना बसला आहे. कल्याण बाजार समितीत भाज्यांची ५० टक्के आवक घटली आहे, तर नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्येही तीच अवस्था असल्याने सर्वच भाज्यांचे दर तीन पटीने कडाडले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले असून ताटातील भाज्या ‘गायब’ होण्याची वेळ आली आहे.
पोलीस बंदोबस्त नाकारला
रोजच्या भाजी, कडधान्य, दुधाअभावी जनतेचे हाल होऊ नयेत यासाठी शेतमाल घेऊन येणाऱया वाहनांना राज्य शासनाने पोलीस बंदोबस्त देण्याचे जाहीर केले आहे. मात्र वाहनांची तोडफोड झाली तर शासन जबाबदारी घेणार का, असे म्हणत वाहतूकदारांनी पोलिसांनी बंदोबस्त दिला तरी शेतमाल घेऊन येण्यास असमर्थता दर्शवल्याने आवक घटली आहे.
१ जूनपासून सुरू असलेल्या संपाचा परिणाम कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटवर स्पष्ट प्रमाणात दिसला. दररोज सरासरी १५० ट्रक, टेम्पो यांच्या माध्यमातून हा शेतमाल बाजार समितीत येतो. गुजरात राज्यासह कर्नाटक, तामीळनाडू येथून नियमित अन्नधान्याची आवक होते. शिवाय शहापूर, मुरबाड, नगर, नाशिक, लासलगाव येथून भाजी, फुले, फळे, कांदा, बटाटा यांची आवक होते. संपाच्या दुसऱ्या दिवशी मात्र नवी मुंबई, गुजरात, राजस्थान येथून पाच ट्रक आणि २२ टेम्पोंमधून ६८८ क्विंटल भाजीपाला तर कांदा-बटाटय़ाचे ५ ट्रक, फळांचे २ ट्रक आले. दररोज सरासरी दहा हजार क्विंटल माल कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होतो. मात्र आज अवघ्या ७० गाड्या आल्या. पाच हजार क्किंटल शेतमालाची आवक झाली. आवक घटल्याने भाज्यांचे दर तिप्पट झाले आहेत.





























































