
सामना प्रतिनिधी । मुंबई
गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्लॅस्टिकबंदीची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या २३ जूनपासून सुरू होणार आहे. त्यानंतर प्लॅस्टिक वापरणाऱयांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने विशेष पथके तयार केली आहेत. प्लॅस्टिकबंदीच्या कार्यवाहीला २३ जूनपासून सुरुवात होणार असल्यामुळे मुंबईकरांना आणि दुकानदार व फेरीवाल्यांना आपल्याकडील प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी आता केवळ १५ दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यानंतर मात्र प्लॅस्टिक वापरणाऱयांना पालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
प्लॅस्टिकच्या पिशव्या, युज अॅण्ड थ्रो प्रकारची कटलरी, हॉटेलमधील पार्सल देण्यासाठी वापरले जाणारे कंटेनर, स्ट्रॉ, प्लॅस्टिकचे चमचे ग्लास अशा सगळय़ाच वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी आता अवघे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदीची घोषणा केलेली असली तरी सध्या दुकानदारांकडे आणि मुंबईकरांकडे घराघरात असलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी २३ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या काळात प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी पालिकेने मोठय़ा प्रमाणावर जनजागृती केली तसेच महत्त्वाच्या ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्रे स्थापन केली होती. त्याचबरोबर प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांकही दिला होता. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांत पालिकेने तब्बल १३७ टन प्लॅस्टिक गोळा केले आहे.
– प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी केली जात असताना कुणाला वेठीस धरले जाणार नाही किंवा काही गैरफायदा घेतला जाणार नाही याकरिता निरीक्षकांना वॉर्ड नेमून दिले जाणार आहेत.
– त्यांना विशिष्ट गणवेश दिला जाणार आहे. तसेच त्यांना ओळखपत्रही दिले जाणार आहेत. अशाच कर्मचाऱयांना कारवाईचा अधिकार असणार आहे.
– २३ जूननंतर सर्वसामान्यांनी प्लॅस्टिकचा वापर करू नये किंवा दुकानदारांकडे प्लॅस्टिकची पिशवी मागू नये, असेही आवाहन पालिका अधिकाऱयांनी केले आहे.
तीन विभागांत होणार कारवाई
२३ जूनपासून कारवाई करण्यासाठी पालिकेने निरीक्षकांची मोठी फौज तयार केली आहे. मार्केट, परवाना विभाग, दुकाने आणि आस्थापना अशा तीन विभागांतील कर्मचाऱयांची याकरिता निवड करण्यात आली आहे. या सर्व निरीक्षकांना कारवाईचे अधिकार देणारी पत्रे देण्याचे काम सध्या सुरू आहे. मंडयांमधील गाळेधारक, फेरीवाले, आणि दुकानदार यांच्यावर हे निरीक्षक दंडात्मक कारवाई करतील.
प्लॅस्टिक जमा करावे
अजूनही ज्यांच्याकडे प्लॅस्टिकच्या वस्तू असतील त्यांनी आपल्या जवळच्या प्लॅस्टिक संकलन केंद्रावर ते जमा करावे तसेच सोसायट्यांनी किंवा व्यावसायिक संघटनांनी १० किलोपेक्षा अधिक प्लॅस्टिक संकलन केलेले असल्यास १८००-२२२-३५७ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत सूचना देण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. जमा केलेले प्लॅस्टिक उचलून नेण्याची व्यवस्था महापालिकेद्वारे केली जाणार आहे.























































