परमवीर गाथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अमृता पेडणेकर

सर्वोच्च लष्करी सन्मानप्राप्त शूरांच्या पराक्रमाच्या गाथा जनसामान्यांना ठाऊक व्हाव्यात म्हणून ‘परमवीरां’च्या कथा रचना बिस्त-रावत यांनी प्रचंड कष्ट घेऊन शोधल्या आहेत. त्यांचे पती लष्करी अधिकारी असल्याने हे लेखन करण्याची स्फूर्ती त्यांना मिळाली आणि एका उत्तम पुस्तकाची निर्मिती झाली.

१९४७-४८ या काळात नोंद झालेल्या हिंदुस्थान-पाक युद्धात प्रचंड वित्तहानी आणि मनुष्यहानी झाली. हिंदुस्थानी जवानांनी प्रचंड शौर्य गाजवून सरहद्दीवर शांतता प्रस्थापित केली. सोमनाथ शर्मा, करमसिंग, राम राघोबा राणे, जदुनाथसिंग आणि पिरुसिंग शेखावत या जवानांना ‘परमवीर चक्र’ हा सर्वश्रेष्ठ सन्मान प्राप्त झाला. त्यांच्या अविस्मरणीय इतिहासाची ही गाथा आहे. याशिवाय 1961मध्ये कांगो युद्ध झाले. त्यात पराक्रमी गुरुबचनसिंग सरालिया हे परमवीर ठरले. १९६२मध्ये हिंदुस्थान-चीन युद्ध झाले. त्यात धनसिंग थापा, जोगिंदर सिंग आणि शैतान सिंग यांना ‘परमवीर’ म्हणून गौरविण्यात आले. १९६५, १९७१, १९८७, १९९०, १९९९ या सालांत झालेल्या युद्धांची गाथासुद्धा अंगावर काटा आणते.

अत्यंत दुर्गम भागांत, प्रचंड विषम हवामानात जवानांचे अहोरात्र देशकार्य सुरू असते. ते जाणून घेणे आपले कर्तव्य आहे. सासू-सुनांच्या कटकटींचे ‘दळण’ दळणारे चॅनेलवाले या परमगाथा कधी पडद्यावर आणण्याचा पराक्रम करतील काय? कटकटीप्रिय प्रेक्षकांना ‘वळण’ लावण्याचे कार्य ते करू शकतील काय? असे काही प्रश्न पडतात. त्यांची उत्तरे कोण देणार? कुणीही नाही! हिंदुस्थानी सैन्यातील आपले जवान डोळ्यात तेल घालून देशातील नागरिकांचे संरक्षण करत असतात. प्रसंगी हे शूरवीर आपल्या प्राणांची बाजी लावतात. त्यांचं बलिदान मांडणारं हे पुस्तक त्यातील प्रत्येक कथोनिशी अंगावर रोमांच आणतं. परमवीर चक्र हा सर्वोच्च लष्करी पुरस्कार लाभलेल्या २१ शूरवीरांच्या पराक्रमाची गाथा सांगणारं हे पुस्तक नक्कीच संग्रही ठेवावं असं आहे.

परमवीर गाथा
रचना – बिस्त-रावत
अनुवाद – भगवान दातार
प्रकाशक – रोहन प्रकाशन, पुणे – ३०
पृष्ठ – २१५, मूल्य – २०० रुपये