
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतल्या मालवणी गावठाण येथे शनिवारी रात्री २३ वर्षीय नित्यानंद मानेने आपल्या आईला १० वाजता कॉल करून आपल्यावर हल्ला झाल्याचं सांगितलं आणि कॉल कट झाला. या फोनमुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठले आणि एका खुनाला वाचा फुटली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्याने फोन केला तो नित्यानंद माने सेंट अँथनी चर्च येथे राहत होता. मर्चन्ट नेव्हीमध्ये कार्यरत असलेला माने ६ महिन्यांच्या सुट्टीवर घरी आला होता. शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता त्याने आईला आपण मित्राचा वाढदिवस साजरा करायला जात असल्याचं सांगितलं. घरातून निघाल्यानंतर नित्यानंद हा त्याच्या वघाटे, महेश केलतकर आणि आकाश मानकर या तीन मित्रांसह मार्वे चौपाटीवर दारुची पार्टी करायला गेला. पार्टी सुरू असताना वघाटे याला पूर्वी झालेल्या एका वादावरून त्या तिघांनी चिडवायला सुरुवात केली. वघाटेला ते सहन न झाल्याने तो तिथून निघून गेला.
वघाटे निघून गेल्यानंतर १० वाजताच्या सुमारास ते तिघे आपली दारू पार्टी संपवून वघाटेच्या घरी पोहोचले. त्यांनी वघाटेला कॉल करून त्याच्या घराबाहेर उभे असल्याचं सांगितलं. चिडवल्यामुळे संतापलेला वघाटे चाकू घेऊन त्या तिघांच्या अंगावर धावून गेला आणि त्यांना धमकावू लागला. चिडलेल्या वघाटेने चाकू फिरवताच नित्यानंदचा हातावर आणि छातीवर वार झाले. वघाटेचा रुद्रावतार बघून त्या तिघांनी तिथून काढता पाय घेतला. पण, या हल्ल्यामुळे नित्यानंद गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, नित्यानंद १० वाजून गेले तरी घरी न परतल्याने त्याच्या आईने त्याला कॉल केला. पहिला कॉल नित्यानंदने उचलला नाही. पण, लगेचच समोरून कॉल करून नित्यानंदने आपल्यावर हल्ला झाल्याचे सांगितले आणि कॉल कट झाला.
नित्यानंदवर वार झाल्यामुळे तो जखमी झाल्याचा अंदाज वघाटेने बांधला होता. त्यामुळे पोलिसांच्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी वघाटेने एका डाव टाकला. त्याने स्वतःहून पोलिसांना संपर्क करून आपल्यावर हल्ला झाल्याची खोटी घटना सांगितली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच वघाटेने नित्यानंद, मानकर आणि केलतकर या तिघांची नावं आरोपी म्हणून सांगितली. पोलीस त्या तिघांना शोधत असताना त्यांना मानकर सापडला. मानकरने पोलिसांना झालेला सर्व प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ नित्यानंदचा शोध सुरू केला. शोधा दरम्यान पोलिसांना वाटेतच झुडुपांमध्ये नित्यानंद बेशुद्धावस्थेत सापडला. त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणात पोलिसांनी वघाटेला नित्यानंदच्या हत्येसाठी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

























































