नीरव मोदीसह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३ हजार कोटींना ठकवून परदेशात पळून गेलेल्या प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदीसह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध मुंबईतील विशेष न्यायालयाने आज अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. या घोटाळय़ाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्याच महिन्यात आरोपपत्र दाखल केले आहेत. त्याचाच आधार घेऊन विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश सलमान आझमी यांनी नीरव मोदी आणि इतर दहा जणांविरुद्ध हे अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. या दहा जणांमध्ये नीरव मोदीच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे. कोटय़वधी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळय़ाप्रकरणी ‘ईडी’ने गेल्याच महिन्यात नीरव मोदी, त्याचे वडील दीपक मोदी, बहीण पूर्वी मेहता, मेहुणा मैनक मेहता, भाऊ नीशल मोदी, दुसरा नातेवाईक नेहल मोदी यांच्यासह एकूण २३ जणांविरुद्ध तब्बल १२ हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहेत. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो परदेशात पळून गेलेला आहे.