गुळगुळीत रस्ता बनवला, पण रस्त्याखाली कुत्रा कसा अडकला ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, आगरा

आगऱ्यातील ताजगंज भागामध्ये सध्या रस्ते तयार करण्याचं काम जोरात सुरू आहे. बुधवारी काही मंडळी नव्याने बनवलेल्या गुळगुळीत रस्त्यावरून मॉर्निंग वॉकला निघाली होती. या मंडळींनी रस्त्याच्या आत अडकलेला एक कुत्रा दिसला. हा कुत्रा रस्त्याच्या आत कसा काय अडकला हे या मंडळींना कळेनासं झालं. यातल्या काहींनी या कुत्र्याचे फोटो काढले जे मोठ्य़ा प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. ही विचित्र घटना कळताच काही हिंदुत्ववादी संघटना घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी तिथे आवाज चढवताच हा कुत्रा रस्त्याच्या खाली कसा काय अडकला याचं कोडं उलगडलं.

या रस्त्याचं काम सुरू असताना हा कुत्रा कडेला झोपला होता. या कुत्र्याच्या अंगावर मजुरांनी आधी वाळू ओतली त्यानंतर डांबर घातलं आणि वरून रोड रोलर फिरवला. गरम डांबर पडल्याने हा कुत्रा आधीच अर्धमेला झाला होता, त्यावरून रोलर फिरवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मजूर आणि कंत्राटदाराच्या या आंधळ्या कारभारामुळे हा कुत्रा रस्त्याच्या खाली अडकला होता. या प्रकाराचा जाब हिंदुत्ववादी संघटनांनी विचारला असता कंत्राटदारांने सांगितले की रात्री अंधार असल्याने मजुरांना कुत्रा दिसला नाही. मात्र अंगावर डांबर पडल्यानंतर आणि त्यानंतर रोलर फिरवताना कुत्रा ओरडला नसेल असं होऊच शकत नाही. त्यामुळे हे कृत्य मुद्दाम करण्यात आलं असावं असा या घटनेविरूद्ध आवाज उठवणाऱ्यांचं म्हणणं आहे. हे प्रकरण पोलिसांत पोहोचल्यानंतर त्यांनी मध्यस्ती करत कुत्र्याला जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याखालून उकरून काढले आणि त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.