
सामना प्रतिनिधी । ठाणे
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी २५ जूनला मतदान होणार आहे. मात्र मतदानासाठी अवघे १२ दिवस शिल्लक असताना कोकण भवनमध्ये निरंतर मतदार याद्यांची सीडीच पोहोचल्या नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या निवडणुकीत मतदारांशी संवाद साधून प्रचार करणे अत्यंत गरजेचे असल्याने उमेदवारांनी आज दिवसभर कोकण भवनमधून मतदार याद्या मिळवण्याचा प्रयत्न केला, पण कोकण भवनातच याद्या उपलब्ध नसल्याने उमेदवारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघातून १४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून १ लाख ४ हजार २६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ठाणे जिल्ह्यात ४५ हजार ८३४, पालघर जिल्ह्यात १६ हजार ९८२, रायगड जिल्ह्यात १९ हजार ९१८, रत्नागिरी जिल्ह्यात १६ हजार २२२, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ हजार ३०८ अशी एकूण १ लाख ४ हजार २६४ इतकी नोंदणी झाली आहे. म्हणजे सुमारे १४ हजार मतदारांची भर पडली आहे. यामध्ये सर्वाधिक ठाणे जिल्ह्याचे मतदार असून त्या खालोखाल रायगड जिल्ह्याचे मतदार आहेत. नवीन मतदारांसह निरंतर मतदार याद्यांची ही आकडेवारी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र मतदारांच्या नावांच्या यादीचा अद्याप ठावठिकाणा नसल्याचे आज समोर आले.
एक लाख मतदारांपर्यंत पोहोचणार कसे?
पाच जिल्ह्यांतील एक लाख मतदारांपर्यंत पोहोचणे हे उमेवारांसाठी सध्या आव्हानात्मक ठरणार आहे. हातामध्ये केवळ १२ दिवस असल्यामुळे उमेदवारांनी मोठय़ा प्रमाणात सोशल मीडियाची मदत घेतली आहे. याशिवाय प्रचार व मेळाव्यांनीही जोर धरला आहे. एकीकडे प्रचाराचा हा फंडा सुरू असताना जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही सुरू झाला आहे. मात्र मतदार यादी हातात असती तर हे काम आणखीन सोपे व जलद झाले असते, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.































































