नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी १५ जुलै रोजी मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

भोर (जि. पुणे), वडगाव (पुणे), मुक्ताईनगर (जळगाव), बार्शीटाकळी (अकोला), वानाडोंगरी (नागपूर) आणि पारशिवनी (नागपूर) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच विविध ११ नगरपरिषदा/ नगरपंचायतींतील प्रत्येकी एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी १५ जुलै २०१८ रोजी मतदान; तर १६ जुलै २०१८ रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, भोर नगरपरिषदेची मुदत संपत आहे. त्याचबरोबर बार्शीटाकळी आणि वानाडोंगरी या नवनिर्मित नगरपरिषदा; तर मुक्ताईनगर, वडगाव व पारशिवनी या नवनिर्मित नगरपंचायती आहेत. शेगाव नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्राकरितादेखील मतदान होत आहे. या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींबरोबरच पोटनिवडणूक होत असलेल्या संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

पोटनिवडणूक होत असलेल्या जागांचा नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय तपशील: जव्हार (जि. पालघर)- ६ब, पोलादपूर (जि. रायगड)- १६, राजापूर (जि. रत्नागिरी)- अध्यक्ष, पंढरपूर (जि. सोलापूर)- १०ब, वाई (जि. सातारा)- ५अ, मेढा (जि. सातारा)- १५, निफाड (जि. नाशिक)- ६, श्रीरामपूर (जि. अहमदनगर)- १२अ, नंदुरबार (जि. नंदुरबार)- १६अ, लोहारा बु. (जि. उस्मानाबाद)- २, मोहाडी (जि. भंडारा)- १२ आणि शेगाव (जि. बुलडाणा)- हद्दवाढ क्षेत्र.

निवडणूक कार्यक्रमाचा तपशील

  • नामनिर्देशनपत्रे सादर करणे-१९ ते २५ जून २०१८
  • नामनिर्देशनपत्रांची छाननी-२६ जून २०१८
  • अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे-०२ जुलै २०१८
  • अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- निकालाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत
  • मतदानाचा दिनांक-१५ जुलै २०१८
  • मतमोजणीचा दिनांक-१६ जुलै २०१८