कारही गेली, पेसेही गेले; फिरायला गेलेल्या व्यापाऱ्याला चोरट्यांनी लुबाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

जळगावमध्ये सकाळी फिरायला गेलेल्या व्यापाऱ्याला अज्ञात चोरट्यांनी दणका दिला आहे. तोंडावर रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी नरेंद्र बहादुरसिंग ठाकुर (५९) या व्यापाऱ्याच्या चेहऱ्यावर मिरचीपुड असलेला स्प्रे मारला. तसेच त्यांच्या डोक्यावर पिस्तूलाने ठोका मारत चोरट्यांनी त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले आणि त्यांची कार घेऊन फरार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमधील आदर्श नगरमधील रहिवासी नरेंद्र ठाकूर यांचा उषा ट्रान्सफोर्ट नावाने व्यवसाय आहे. ठाकूर हे आपल्या मित्रांसह नेहमीप्रमाणे मेहरूण तलावाजवळ फिरायला गेले होते. ठाकूर यांचे मित्र पुढे निघून गेल्यानंतर चोरट्यांनी डाव साधला. तोंडावर रुमाल बांधून आलेल्या दोन दुचाकीस्वारानी ठाकूर यांच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारला आणि डोक्यावर पिस्तूलाचा दणका दिला. चोरट्यांनी जोरजबरदस्ती करून ठाकूर यांच्या खिशातून रोख दोन हजार रुपये आणि कारची चावी काढून घेतली. रोख रक्कम आणि कार घेऊन चोरटे पसार झाले. चोरट्यांनी डोक्यात पिस्तूल मारल्याने ठाकूर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणी फिर्यादी ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठाकूर यांच्या गाडीचा क्रमांक एम.एच. १९ बी. यू ३७६५ असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.