
>>जयेश राणे<<
एका इंग्रजी म्हणीचा अर्थ असा की, ‘अपयश नव्हे तर कमी दर्जाचं ध्येय बाळगणं चुकीचं आहे’. जय-पराजय होतच असतात, पण त्यासाठी ध्येयाशी तडजोड नसावी. खूप मोठं ध्येय मनाशी ठरवून त्यात यशस्वी होणारी हजारो माणसं असतात. कदाचित लाखो लोकांना त्यांच्या इतकी उत्तुंग भरारी घेता येत नसेलही, पण मोठं ध्येय गाठण्याच्या इच्छेने त्यांनी केलेले प्रयत्न त्यांना आयुष्यात भरपूर काही देऊन जातात. मुळात ध्येयच फार छोटं असेल तर त्यातलं अपयश मनाला अधिक डाचेल. फार मोठय़ा ध्येयासाठी खूप प्रयत्न करूनही अपयश आलं तरी त्यातही आपण खूप प्रयत्न केल्याचं समाधान आणि लढण्याची जिद्द सामावलेली असते. ध्येय कुणाचं काहीही असू शकतं. शिक्षण, खेळ, कला कोणत्याही माध्यमात पुढे जायचे, स्वतःचा ठसा उमटवण्याचे तर प्रयत्न करावेच लागतात. मनाशी काहीतरी ध्येय ठरवावं लागतं. ते मनात ‘दिसत’ असेल तरच जोरकसपणे प्रयत्न सुरू होतात. आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रावीण्य, विजय मिळवण्यासाठी आपण मनःपूर्वक प्रयत्न करतो. फक्त ते ‘ध्येय’ इतर कुणी लादलेलं नसावं. व्यक्तिमत्त्व विकासात कुवत आणि प्रयत्न यांची सांगड घालून एखाद्याला काय जमेल, झेपेल याविषयी मार्गदर्शन जरूर करावं, पण निर्णय ज्याचा त्याला घेऊ द्यावा. ध्येयासक्त आणि यशस्वी लोकांच्या जगभरच्या अनेक गोष्टी सांगता येतील. काही महिन्यांपूर्वी दिवंगत झालेले खगोलभौतिकी शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं उदाहरण तर जगाला स्तिमित करणारं. मेंदू आणि चेहऱ्याचे काही स्नायू वगळता संपूर्ण शरीर विकलांग झाल्यानंतरही चाळीस वर्षांच्या काळात त्यांनी विश्वरचनेसंबंधी मूलभूत विचार केला. जगन्मान्य ग्रंथसंपदा निर्माण केली आणि एकविसाव्या शतकातले ज्येष्ठ, श्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणून लौकिक मिळविला. वास्तविक पैसा, प्रतिष्ठा वगैरे गोष्टींचा इतरांसारखा उपभोग घेण्याच्या स्थितीत नसलेलं जर्जर शरीर घेऊन हा महान माणूस इतकी वर्षे जगत होता. खऱ्या अर्थाने ‘जगत’ होता. इतर कोणी ‘मोटर न्यूरॉन’सारख्या आजाराच्या पहिल्याच धक्क्याने खचून गेला असता. त्यातच डॉक्टरसुद्धा कोणती शाश्वती देत नव्हते, पण स्टीफनचं आत्मबल आजाराला पुरून उरलं. ‘हॉकिंग रेडिएशन’सारखं कृष्णविवरांसंबंधीचं संशोधन त्यांनी केलं. अशी प्रेरणादायी माणसं जगात कमी असली तरी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक असतात. अलीकडेच एक बातमी वाचनात आली ती एका छत्तीस वर्षीय ऑस्ट्रेलियन गिर्यारोहकाची. त्याने पृथ्वीवरच्या सात खंडांमधली सात उत्तुंग शिखरे एकशे सतरा दिवसांत सर करून नवा जागतिक विक्रम नोंदवला. स्टीव्ह प्लेन असं या तरुणाचं नाव आहे. १६ जानेवारीपासून सुरू झालेली त्याची अथांग जिद्दीची साहसयात्रा १४ मे रोजी माऊंट एव्हरेस्ट या जगातल्या सर्वोच्च शिखरावर पाऊल ठेवल्यानंतर संपली. १९५३ मध्ये शेर्पा तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्ट पहिल्यांदा सर केल्याच्या घटनेला यंदा ६५ वर्षे पूर्ण होतायत. त्याचवेळी या तरुण गिर्यारोहकाने जगभरची सर्व सर्वोच्च शिखरं पादाक्रांत करण्याचा अपूर्व विक्रम नोंदवला आहे. तोही विक्रमी वेळेत. स्टीव्ह प्लेन हा ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरातला रहिवासी. त्याने त्याच्या या गिर्यारोहणाच्या विक्रमाचा आरंभ केला तो अँटार्क्टिका या दक्षिण ध्रुवीय खंडावर असलेल्या ‘माऊंट विल्सन’ या शिखरापासून. या वर्षीच्या १६ जानेवारीला स्टीव्ह माऊंट विल्सनवर पोहोचला. आता पुढचा टप्पा होता जगातल्या सर्व खंडांमधल्या उत्तुंग शिखरांवर पाय रोवण्याचा. जबरदस्त आत्मविश्वासाने तो अँटार्क्टिकाकडून दक्षिण अमेरिकेकडे रवाना झाला. या खंडातील सर्वात उंच गिरीशिखर होतं ‘माऊंट ऍकोगुआ’. ते जिंकल्यावर स्टीव्हने त्याचा मोर्चा वळवला तो आफ्रिकेतल्या ‘माऊंट किलीमॅन्जारो’कडे. त्या शिखरानंतरचा उत्तुंग प्रवास होता न्यू गिनिआमधल्या ‘माऊंट कार्स्टेन्झ पिरॅमिड’कडे जाणारा. ऑस्ट्रेलिया आणि ओशनियामधलं हे शिखर सर करून स्टीव्ह वळला युरोपमधल्या ‘माऊंट एल्ब्रस’च्या दिशेने. तेसुद्धा सर झालं. आता सप्तखंडांतील दोन शिखरं उरली होती. उत्तर अमेरिकेतल्या डेनाली पर्वतावर आरोहण केल्यानंतर स्टीव्हसाठी फक्त एकच उत्तुंग आकांक्षा खुणावत राहिली ती ‘माऊंट एव्हरेस्ट’ची. १४ मे २०१८ या दिवशी त्या शिखरावर तो अभिमानाने उभा राहिला तेव्हा जगभरच्या समस्त गिर्यारोहकांनाही त्याचा अभिमान वाटला असेल. विशेष म्हणजे २०१४ मध्ये गिर्यारोहण करीत असताना स्टीव्हला अपघात होऊन अनेक जखमांचा सामना करावा लागला होता. मात्र त्या आघाताने तो खचला नाही. उलट मनात उत्तुंग आकांक्षा घेऊन पुन्हा उभा राहिला. नुसता उभा राहिला नाही, तर पृथ्वीवरच्या सात खंडांतल्या सात सर्वोच्च शिखरांवर उभा ठाकला. गेल्या वर्षी पोलॅण्डच्या जॅन्यूझ कोचॅन्स्की या गिर्यारोहकानेही सप्तखंडांतील सर्वोच्च सप्तशिखरांवर पदार्पण करण्याचा ध्यास तडीला नेला होता. त्याने १२६ दिवसांत त्याचं हे ध्येय साध्य केलं. स्टीव्ह प्लेन याने ते ११७ दिवसांत करून दाखवल्याने सध्याचा जागतिक विक्रम त्याच्या नावे नोंदला गेला. ‘पंङ्गुम लंघयते गिरीम’ असं आपल्याकडच्या एका सुभाषितात म्हटलं आहे. स्टीव्हसारख्या तरुणाच्या साहसाला सलाम करीत असतानाच चीनच्या ६९ वर्षांच्या क्झिया बोयू या वृद्धत्वी तारुण्य जोपासणाऱ्या गिर्यारोहकानेही एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलंय. अमर्याद जिद्द आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर माणूस काम करू शकतो याची ही प्रेरणादायी सत्यकथा.






























































