
>>विलास पंढरी<<
आसने आणि प्राणायाम यांपुरतेच योगाला मर्यादित ठेवणे हे अयोग्य आहे. एखाद्या हिऱ्याला पैलू पाडल्यावरच तो अनमोल होत असतो. योगशास्त्र मानवी जीवनाला पैलू पाडून लौकिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही पातळींवर त्याला अनमोल बनवते. म्हणून प्रत्येकाने ‘योगाभ्यासक’ बनायला हवे. योग मन आणि आत्मा यांच्या पातळीवर कार्य करून साधकाला मोक्षाप्रत पोहोचवतात.
जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस, आंतराराष्ट्रीय दिवस म्हणतात. हिंदुस्थान सरकारच्या प्रयत्नाने सुरू झालेला व जगभर पाळाला जाणारा असाच एक दिवस म्हणजे ‘योग दिन’. पैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत.
केवळ आसन किंवा प्राणायाम यांनाच बऱ्याच वेळेला आपण योग समजत असतो. मात्र तसे नसून योगाची व्याप्ती खूप मोठी आहे. युज् या मूळ संस्कृत धातूपासून तयार झालेल्या ‘योग’ या शब्दाचा अर्थ ‘जोडणे’ असा होतो. आपलं शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणे याला योग म्हणतात. आरोग्य या शब्दाची जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली व्याख्या अशी आहे. ‘शरीराने, मनाने, आध्यात्मिक आणि सामाजिकदृष्टय़ा तंदुरुस्त असलेली व्यक्ती म्हणजे खरी तंदुरुस्त व्यक्ती होय.’ योग ही सर्वांगीण आरोग्यपूर्ण जीवनशैली आहे, असे म्हणायला हरकत नाही. भगवद्गीतेनुसार योगाची ही परंपरा अनादी अशी असून स्वतः भगवान श्रीकृष्णांना ‘योगेश्वर’ असे म्हटले असले तरीही ते योगशास्त्राचे उद्गाते नव्हेत. पतंजलीदेखील योग्यशास्त्राचे उद्गाते नसून त्यांनी योगाला सुसूत्रतेने बांधण्याचे केलेले योगदान अनन्यसाधारण आहे. योगाचे उद्गाते भगवान शंकर असून त्यांनी पहिल्यांदा पत्नी पार्वतीला योग सांगितल्याचे उल्लेख पुराणात आढळतात. संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. तो देशभर सर्व शैक्षणिक आणि शासकीय कार्यालयांमध्ये तसेच जगभरात साजरा होईल. जवळपास पाच हजार वर्षांहून अधिक मोठी परंपरा असणारी योग विद्या ही हिंदुस्थानने जगाला दिलेली देणगी आहे. आचार्य पतंजलींनी योगाची व्याख्या करताना ‘योगस्तु चित्तवृत्तीनिरोधः’ अशी केली आहे. याचा अर्थ मनाला स्थिर करणे म्हणजे योग. ‘समत्वं योगमुच्यते।’ असे भगवद्गीता सांगते. सिद्धी आणि असिद्धी या दोहोंबाबत समान दृष्टी ठेवून कर्म करत राहणे म्हणजे योग. याशिवाय ‘योगः कर्मसु कौशलम्।’ असेही भगवान श्रीकृष्ण म्हणतात. कर्मयोग, ज्ञानयोग, राजयोग, हठयोग असे विविध योगमार्ग दिसून येतात. सखोल विचार केल्यास योग ही अशी निरंतर प्रक्रिया आहे जी कायिक, वाचिक आणि मानसिक या तीनही पातळींवर स्थैर्य प्रदान करून माणसाला सर्वार्थाने निरोगी ठेवते. सुश्रुतसंहितेत ‘अनागताबाधा प्रतिषेध’ नावाचा अध्याय आहे. अनागता बाधा म्हणजे अद्याप जी आलेली नाहीत अशी दुखणी किंवा आजार. या अध्यायात दिनचर्येचे सविस्तर वर्णन करून या ‘अद्याप न आलेल्या’ विकारांना दूर ठेवण्याचा मार्ग दाखवला आहे. म्हणजेच आजाराला दूर ठेवण्याचा मार्ग म्हणजे योग होय. ‘हेयं दुःखम् अनागतम्।’ असे सांगत असतानाच पतंजली योगाची आरोग्यविषयक व्याप्ती आणखी वाढवतात. निरोगी राहण्यासाठी योग हे आपल्या दैनंदिन जीवनाचे अंग बनायला हवे.
आयुर्वेदाप्रमाणे योगाचीदेखील आठ अंगे आहेत. यम, नियम, आसन आणि प्राणायाम ही बाह्य अंगे शरीराकडे अधिक लक्ष देतात, तर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही अंतर अंगे आहेत. योग मन आणि आत्मा यांच्या पातळीवर कार्य करून साधकाला मोक्षाप्रत पोहोचवतात. आसने आणि प्राणायाम यांपुरतेच योगाला मर्यादित ठेवणे हे अयोग्य आहे. एखाद्या हिऱ्याला पैलू पाडल्यावरच तो अनमोल होत असतो. योगशास्त्र मानवी जीवनाला पैलू पाडून लौकिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही पातळीवर त्याला अनमोल बनवते. म्हणून प्रत्येकाने ‘योगाभ्यासक’ बनायला हवे. दुर्दैवाने एमआयएमसारख्या काही मुस्लीम संघटना योगाला हिंदूंची कला किंवा मुस्लीमविरोधी असल्याने विरोध करीत आहेत. एवढेच नव्हे तर काही राजकीय पक्ष केवळ भाजप सरकारला विरोध म्हणून जगाने स्वीकारलेल्या योग दिनाला विरोध करताना दिसतात. म्हणून २१ जून रोजी असणारा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ हा केवळ एका दिवसापुरता साजरा करण्याचा दिवस न राहता आपल्या सगळ्यांची दैनंदिन योगाकडे वाटचाल ठरवणारा व्हायला हवा.


























































