
सामना प्रतिनीधी । महाड
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्रीनदी पुलाच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दुर्घटनाग्रस्त पुलाशेजारील जुना पूल पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाचा पाया भक्कम करताना नदीपात्रात झालेल्या ब्लास्टिंगमुळे जुन्या पुलाला हादरे बसल्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन जुन्या पुलावरची वाहतूक बंद केली असली तरी याचा अतिरिक्त भार सहा महिन्यांत उभारलेल्या नवीन पुलावर पडणार आहे.
२ ऑगस्ट २०१६ साली झालेल्या ब्रिटिशकालीन सावित्रानदी पूल दुर्घटनेमुळे सर्वत्र हाहाकार उडाला होता. दोन एसटी बसेस आणि एक तवेरा वाहून गेल्याने चाळीस प्रवाशांना या दुर्घटनेत जलसमाधी मिळाली होती. या घटनेला दोन वर्षे हेत आली तरी त्या आठवणींचा थरकाप अजूनही तसाच आहे. दरम्यान दुर्घटनाग्रस्त पुलाच्या वरच्या बाजूला २००० साली बांधण्यात आलेल्या पुलाची वाहतूक पेलण्याची क्षमता कमकुवत असल्याचे निदर्शनास येताच केंद शासनाने सहा महिन्यांत नवीन पूल उभा केला. या नवीन पुलावरून मुंबईकडे तर जुन्या पुलावरून गोव्याकडे वाहतूक सुरू होती. मात्र या वर्षीपासून महामार्गाच्या चौपदीकरणाला सुरुवात झाल्याने जुन्या पुलाशेजारी वरच्या बाजूला नवीन पुलाच्या बांधकामाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामादरम्यान ब्लास्टिंगमुळे जुन्या पुलाला जोरदार हादरे बसले असल्याची शक्यता आहे. पावसाळ्यात सावित्रीनदी रौद्र अवतार धारण करत असल्याने २०१६ चा धसका घेतलेल्या महामार्ग प्रशासनाने पावसाळा सुरू होताच जुना पूल बंद केला आहे.
नवा पूल अंधारात
ब्रिटिशकालीन पूल कोसळला तेव्हा या पुलावरचे पथदिवे बंद होते. एकीकडे कोसळणारा पाऊस तर दुसरीकडे काळोखामुळे तुटलेला पूल दृष्टीस न पडल्याने अनेक वाहने नदीत कोसळली. हा अनुभव गाठीला असतानाही नवीन पुलाचे बांधकाम करणाऱया ठेकेदाराने पुलावरील पथदिव्यांचे विद्युत बिल न भरल्याने गेल्या वर्षभरापासून पूल अंधारात आहे. त्यामुळे पुलावरून प्रवास करणेही अवघड झाले आहे. पुलावरून दुहेरी वाहतूक होणार असल्याने पथदिवे चालू करावेत. त्याचप्रमाणे पुलावर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.























































