
प्रदीप म्हात्रे ,मराठी विज्ञान परिषद <<[email protected]>>
प्लॅस्टिक बंदी सुरू तर झालीय… पण सर्वसामान्यांनी पर्यावरणपूरक कसे राहायचे हे मात्र सरकारने सांगितलेले नाही. म्हणून मग ही काळजी आपण सर्वसामान्य माणसांनीच घ्यायला पाहिजे. आपल्याकडे असलेल्या वस्तूंचा, उपकरणांचा नीट वापर केला, ती वापरताना तारतम्य वापरले तर प्लॅस्टिक बंदीसारख्या समस्येला तोंड देता येणे शक्य आहे. पर्यावरणाची जितकी काळजी घेता येईल तेवढी आपणच घ्यायला हवी. प्लॅस्टिक बंद करणे एकाएकी आपल्याला शक्य होणार नाही. पण प्लॅस्टिकचा वापर आपण स्वतःच हळूहळू बंद करायला हवा. यामुळे पर्यावरणाचीही काळजी घेतली जाईल आणि आपल्याला पर्यावरणपूरकही राहाता येईल.
साधारणपणे प्लॅस्टिक आपण रोजच्या कामामध्ये वापरतच असतो. तो वापर टाळता येणे शक्य होणारच नाही. पावसाळा सुरू झालेला असल्याने छत्री वापरतो, त्यात प्लॅस्टिकचा वापर केलेला असतोच. देशातल्या मातीशी, येथील हवेशी जुळवून घेतलं तरच ते आपल्या सर्वांच्या फायद्याचे आहे.
- आपली कागदपत्रे भिजू नयेत यासाठी आपण ती प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्येच घालून ठेवतो. प्लॅस्टिकचा हा उपयोग तर आपण टाळू शकणार नाही. पण ज्या प्लॅस्टिकचा निचरा होऊ शकत नाही असे प्लॅस्टिक टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- पर्यावरणपूरक राहण्यासाठी सर्वात आधी स्वयंपाकघरात काही काळजी घ्यायला हवी. जेवणाची सर्व तयारी पूर्ण झाली की मगच गॅस पेटवायला पाहिजे. अशा पद्धतीने पर्यावरणपूरक राहाता येईल.
- घरातील इलेक्ट्रीकची उपकरणेही नीट वापरली पाहिजेत. वेळोवेळी त्यांची निगा राखली गेली पाहिजे. त्यांची सर्व्हिसिंग नियमितपणे व्हायला हवी.
- आपल्या घरात अनेक प्रकारची इलेक्ट्रीक उपकरणे असतात. ती सगळीच आपण गरजेनुसार वापरत असतो. पण एकावेळी एकच इलेक्ट्रीक उपकरण वापरले तर इतर उपकरणांवर आणि वीजदाबावरही ताण येणार नाही.
- विजेच्या जास्त वापरातून पर्यावरणाला हानी पोहोचते. आजच्या काळात तरी पर्यावरण पूरक विकास करणे ही गरज होऊन बसली आहे. त्यादृष्टीनेच कारवाई होत असेल तर त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे.
- जगभरातच तापमानामध्ये प्रचंड वाढ होत आहे. त्यासाठी पर्यावरण विभागही वेगवेगळे उपक्रम राबवतोय. म्हणूनच तर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांच्या उत्पादनावर आणि त्याच्या वितरणावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.





























































