‘ही’ स्पर्धक होणार बिग बॉसमधून बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बिग बॉस मराठीमध्ये सध्या विजेतपदासाठी घमासान युद्ध रंगलं आहे. प्रत्येकजण आपआपल्या परिने खेळून जिंकण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आज रात्री विंकेडच्या डावात एका खेळाडूला या घराला कायमचा रामराम ठोकावा लागणार आहे. या आठवड्यात स्मिता गोंदकर, शर्मिष्ठा राऊत, उषा नाडकर्णी, सई लोकूर, आस्ताद काळे नॉमिनेट झाले होते. मात्र या पाच पैकी आज सर्वांची लाडकी आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी घरातून बाहेर होणार असल्याचे समजते. स्वत:वरील प्रत्येक टीकेवरून नाराज होणाऱ्या आऊंना बिग बॉसच्या प्रेक्षकांनी बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर आता त्या कशा प्रकारे रिअॅक्ट होतील ते बघण्यासारखे असेल.

usha-nadkarni-image-2

७० वर्षाच्या उषा नाडकर्णी या बिग बॉसच्या घरात आल्या त्यावेळी सुरुवातीला या फार काळ येथे राहू शकतील असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र आऊंनी बिग बॉसच्या घरातील कठिण परिस्थितीतही ७० दिवस काढले. पडद्यावर कायम आखाड सासूची भूमिका करणाऱ्या आऊ या घरात तशा शांतच दिसल्या. त्या कधीच कुणासोबत भांडल्या नाहीत किंवा मालिकांमध्ये जसा त्यांचा कजाग स्वभाव दाखवला जातो तसा कधीच बिग बॉसच्या घरात दिसला नाही. त्यावरून महेश मांजरेकर यांनी सतत त्यांना या घरात जीभेची सुरी चालव सल्ला दिला होता. मात्र उषा नाडकर्णींनी कुणाशी वाद न घालता शांत खेळ खेळण्याचाच पवित्रा घेतला होता. त्यांचा हा पवित्राच त्यांना महागात पडला असल्याचे समजते. तसेच बिग बॉस हे आता त्याच्या अंतिम टप्प्याकडे वळू लागले आहे. घरातील टास्क अधिकाधिक कठिण होत आहेत. आतापर्यंत अनेक टास्कमध्ये आऊंना त्यांच्या प्रकृतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळेच कदाचित आऊंना यावेळच्या नॉमिनेशनमध्ये सर्वात कमी मतं पडल्याचे समजते.