कळंबुसरे शाळेच्या जीर्ण इमारतीमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकुमार भगत । न्हावाशेवा

रायगड जिल्हा परिषदेच्या कळंबुसरे येथिल शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी ही इमारत धोकादायक असून ती पाडण्यात यावी असा अहवाल देऊनही ग्रामपंचायत व जिल्हा परिषद याकडे दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचा जीव धोक्यात आला आहे.

कळंबुसरे येथील ही शाळा अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. शाळेच्या छप्परावर मोठ-मोठाली झाडे उगवली आहेत. इमारतीच्या भिंती भूसभशीत झाल्या असून पावसात या भिंती केव्हाही ढासळण्याची शक्यता आहे. या इमारतीत गेल्यावर्षी पर्यंत शाळा भरत असे. आता ही शाळा बाजूच्या नविन इमारतीत भरत असली तरी ही जूनी इमारत ही नविन इमारतीच्या लगतच असल्याने शाळेतील मुले ही या इमारतीच्या आजूबाजूलाच खेळत असतात. शाळेचे स्वच्छतागृह देखील या जीर्ण इमारतीच्या बाजूलाच असल्याने या ठिकाणी मुलांचे सतत जाणे येणे असते. त्यामुळे जर ही इमारत किंवा या इमारतीचा भाग पडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या इमारतीच्या बाजूनेच ग्रामपंचायतीचा वहिवाटीचा रस्ता आहे. ही इमारत पाडून टाकावी यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र तरीही इमारत पाडली जात नसल्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची वाट पहात आहेत का असा सवाल ग्रामस्थ आणि पालकांकडून विचारण्यात येत आहे.