तर्राट स्टेशन मास्तरमुळे रेल्वेचा खोळंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बिजनौर

उत्तर प्रदेशमधील नजीबाबाद आणि त्याच्या आजूबाजूच्या रेल्वे स्थानकांवर शुक्रवारी एकच गोंधळ उडाला. मुरशदपूर रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तर तर्राट होऊन झोपला. यामुळे एक्सप्रेस गाड्यांना मार्ग मोकळा असल्याचे संकेतच मिळाले नाहीत. परिणामी जम्मू-तावी -हावडा एक्सप्रेससह चार लांब पल्ल्याच्या गाड्या व दोन मालगाड्या स्थानकातच थांबवण्यात आल्या. यामुळे हादरलेल्या अधिकाऱ्यांनी मुरशदपूर रेल्वे स्थानकात धाव घेतली. तेव्हा स्थानकातील बाकड्यावर स्टेशन मास्तर ‘टल्ली’ होऊन झोपल्याचे त्यांना दिसले. या स्टेशन मास्तरला निलंबित करण्यात आले आहे. दीप सिंह असे त्याचे नाव आहे.

नजीबाबाद पासून दहा किलोमीटर अंतरावर मुरशदपूर रेल्वे स्थानक आहे. गेल्या शुक्रवारी तेथे स्टेशन मास्तर दीप सिंह याची ड्युटी होती. पण ड्युटीवर असतानाच दीप सिंह यांनी मद्यप्राशन केले व ते स्थानकातच झोपले. रात्री साडेदहाच्या सुमारास नजीबाबादचे रेल्वे स्टेशनमास्तर अविनाश गुप्ता यांनी दीप सिंह यांना फोन केला. हा फोन त्यांनी डेहराडूनहून वाराणसीला जाणाऱ्या जनता एक्सप्रेससाठी मार्ग मोकळा करण्यासंबंधी होता. पण अनेकवेळा फोन करूनही सिंह यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे गाडी नजीबाबाद स्थानकातच थांबवण्यात आली. दरम्यान गुप्ता यांनी मुरादाबाद कंट्रोल रुममध्ये फोन करुन मुरशदपूरचे स्टेशन मास्तर फोन उचलत नसल्याचे सांगितले.

काही अघटित घडले असावे अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. हे कळताच रेल्वे यंत्रणा हादरली. त्यानंतर दुसऱ्या एका स्टेशन मास्तरला मुरशदपूर स्थानकात पाठवण्यात आले. तिथे गेल्यावर दीप सिंह तर्राट असल्याचे व त्याच्याजवळ दारुच्या बाटल्या पडल्याचे त्यांना दिसले. या दरम्यान अन्य तीन एक्सप्रेस व दोन मालगाड्यांनाही स्थानकातच थांबावे लागले. यामुळे रेल्वेचे वेळापत्रकच विस्कटले व सगळ्यांचाच खोळंबा झाला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी सिंह यांना उचलून पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर सिंह यांना तात्काळ निलंबित करण्यात आले.