मोदी आल्यापासून देशाची अधोगतीच! डॉ. अमर्त्य सेन कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खर्‍याखुर्‍या आणि ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष भलतीकडेच वळवत असतात, असे सांगतानाच २०१४ सालापासून हिंदुस्थानची अधोगतीच सुरू झाली आहे, असा स्पष्ट आरोप नोबेल विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी केला. ते ‘भारत और उसके विरोधाभास’ या आपल्या हिंदी ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.

२०१४ सालानंतर हिंदुस्थानने अत्यंत चुकीच्या दिशेने खतरनाक उडी मारली आहे, असे सांगून सेन म्हणाले की, वाढत्या अर्थव्यवस्थेच्या पिछेहाटीला देशातील विरोधाभासच कारणीभूत आहे. सामाजिक क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेल्यामुळेच देश चुकीच्या दिशेने चालला आहे.

२० वर्षांपूर्वी अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर श्रीलंकेपाठोपाठ हिंदुस्थान उत्तम देश ठरला होता. आता दारुण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पाकिस्तान आघाडीवर असल्यामुळेच हिंदुस्थान पहिल्या क्रमांकावर जाण्यापासून बचावला आहे, असे त्यांनी सांगितले. शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात मागील सरकारच्या तुलनेत सध्याच्या मोदी सरकारने काहीही केलेले नाही, असेही ते म्हणाले. मोदी आणि राहुल गांधी असोत की आणखी कोणामधील लढाई असो ती अजिबात महत्त्वाची नाही. हिंदुस्थानचे काय, हाच प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात मागील सरकारच्या तुलनेत सध्याच्या मोदी सरकारने काहीही केलेले नाही. दलितांना देशात आजही अन्नाची भ्रांत आहे, शिक्षण, आरोग्य सेवा मिळण्याची त्यांना शाश्वती नाही, असे अमर्त्य सेन म्हणाले.