
सामना ऑनलाईन । चेन्नई
तमिळनाडुची राजधानी असलेल्या चेन्नई येथे एका सरकारी शाळेतील ९९ वर्षांच्या निवृत्त मुख्याध्यापकाने १० वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीच नाव परशुराम असून मुलीच्या पालकांनी याबद्दल पोलिसात तक्रार केली आहे.
चेन्नई येथील शाळेतील निवृत्त परशुराम हा सन्नीरकुप्पम येथे राहतो. त्याची सन्नीरकुप्पम इथे एकूण पाच घरं आहेत. त्यामधील एक घर परशुरामने पीडित मुलीच्या पालकांना दोन वर्षांपूर्वी भाड्याने राहण्यास दिलं होतं. शुक्रवारी रात्री या मुलीच्या पोटात अचानक दुखू लागलं, मात्र कुटुंबीयांनी त्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. पण, दुसऱ्या दिवशीही दुखणं कायम राहिल्याने कुटुंबीयांनी तिची वैद्यकीय चाचणी केली. त्यावेळी मुलीवर बलात्कार झाल्याचं उघडकीस आलं. तसेच मुलीच्या पालकांनी तिला याबद्दल विचारले असता, तिने आपल्यावर घरमालक परशुराम यानं बाथरुममध्ये नेऊन हे घाणेरडं कृत्य केल्याचं सांगितलं. तसंच परशुराम तिला अनैसर्गिक गोष्टीही करण्यास भाग पाडत असे, असंही तिने सांगितलं.
या घटनेमुळ मुलीच्या पालकांना धक्का बसून त्यांनी परशुरामची शनिवारी पोलिसात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी आरोपी परशूरामला राहत्या घरातून अटक केली आहे. या घटनेबद्दल परशुरामला विचारलं असता आपणच बलात्कार केला असल्याचं मान्य केलं आहे. तसेच पोलिसांनी आरोपी परशुरामवर पोक्सो अॅक्टनुसार कारवाई केली आहे.

























































