
सामना ऑनलाईन, नोएडा
सॅमसंग कंपनीने नोएडा येथे जगातल्या सर्वात मोठय़ा मोबाईल फॅक्टरीचे उद्घाटन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांच्या हस्ते या फॅक्टरीचे उद्घाटन करण्यात आले. सध्या सॅमसंग देशामध्ये दरवर्षी ६.८ कोटी स्मार्टफोनची निर्मिती करते २०२०पर्यंत ही संख्या १२ कोटींपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे.
२००७ सालापासून सॅमसंग कंपनी हिंदुस्थानात मोबाईलचे उत्पादन करत आहे. नोएडा येथील सेक्टर ८१ मध्ये ही फॅक्टरी असून ही फॅक्टरी १९९५ साली बांधण्यास सुरुवात झाली. या मूळ फॅक्टरीचा विस्तार करण्यात येणार असून त्यासाठी सॅमसंगने ४९१५ कोटींची गुंतवणूक केली आहे. याबाबत सॅमसंग इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. सी. हाँग म्हणाले की, ‘नोएडामध्ये जगातली ही सर्वात मोठी फॅक्टरी सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या फॅक्टरीला आम्ही जगातले मोबाईल निर्मितीचे हब बनवणार आहोत.

























































