तरुणाचा खून करून मृतदेह कोरड्या विहिरीत टाकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वैजापूर/खंडाळा

धारदार शस्त्राने तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह पोत्यात गुंडाळून कोरड्या विहिरीत टाकल्याची घटना वैजापूर तालुक्यातील खंडाळा शिवारात आज मंगळवारी उघडकीस आली. मृताचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून, अद्याप त्याची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वैजापूर-संभाजीनगर रस्त्यावर खंडाळा शिवारात अब्दुल शेख सलाम यांचे शेत आहे. त्याच्या गट क्रमांक ३१० मधील शेतात कोरडी विहीर आहे. या विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस पाटील नितीन बागुल यांनी पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक प्रतापसिंह बहुरे, आर.एम. जाधव, बी.बी. डांगे, पोलीस उपनिरीक्षक राहुल मोरे, हेडकॉन्स्टेबल विजय खोकड, पोलीस नाईक राहुल थोरात, सचिन सोनार आदींनी घटनास्थळी भेट दिली. विहिरीत दोर टाकून दोघांनी मृतदेह बाहेर काढला. चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या. त्याला बऱ्याच दिवसांपूर्वी मारून पुरावा नष्ट करण्यासाठी पोत्यात गुंडाळून मृतदेह साठ फूट विहिरीत फेकून दिला. मृताची ओळख पटली नसल्याने हा खून कुणी व का केला, याचा तपास पोलीस करीत आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पोलीस पाटील नितीन बागूल यांच्या माहितीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात खून व पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी करीत आहेत.