शिक्षकांच्या रिक्त जागा आणि वाळू वाहतूकीवरुन पंचायत समिती सदस्य आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देवरुख

संगमेश्वर तालुक्यातील ९० प्राथमिक शिक्षकांची जिल्हा बदली झाल्याने तालुक्यात ९० जागा रिक्त झाल्या आहेत. यामुळे तालुक्यातील अनेक शाळांमधून शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने यावर तात्पुरत्या उपाययोजना करण्यात याव्यात तसेच डिंगणी करजुवे मार्गावरून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे पास चेक करावेत आणि वाळू परवान्याच्या मुदतीची तपासणी करण्यात यावी या मुद्यांवरुन संगमेश्वर पंचायत समितीच्या बैठकीत सदस्य आक्रमक झाले. याबाबतचे ठरावही बैठकीत करण्यात आले.

संगमेश्वर पंचायत समितीची मासिक सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित सभापती सोनाली निकम या होत्या. सभेमध्ये तालुक्यात सध्या ९० प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त असल्याने कार्यरत शिक्षकांवर त्याचा अधिक भार पडत असल्याचे मत मांडण्यात आले. काही ठिकाणी पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळांमध्ये अधिक पटसंख्या असल्याने त्याठिकाणी २ शिक्षक असणे गरजेचे बनले आहे. मात्र ९० शिक्षकांच्या परजिल्ह्यात बदल्या झाल्याने या जागा रिक्त राहील्या आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा सदस्य संजय कांबळे यांनी मांडला या विषयाला सदस्य सुजित महाडिक, जयसिंग माने यांनी दुजोरा दिला.

जिल्हा परिषदेने जिल्हा बदली झालेल्या या ९० शिक्षकांना कार्यमुक्त केल्याने संगमेश्वर तालुक्यातील शिक्षकांची ही ९० पदे रिक्तच राहीली आहेत. या ठिकाणी अन्य शिक्षकांना सामावून घेण्यात आलेले नाही. तसेच आचारसंहिता संपून आठवडा उलटला तरी जिल्ह्यातील तालुकांतर्गत बदल्या रखडल्याने रिक्त शाळांमधून कोणीही शिक्षक उपलब्ध होत नाहीत असे संजय कांबळे यांनी बैठकीत नमूद केले. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन रिक्त असलेल्या ९० शिक्षकांची पदे तात्पुरती तरी भरावीत असा ठराव करुन तो जिल्हा परिषदकडे पाठविण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

याबरोबरच विद्यार्थ्यांच्या गणवेशा करीता त्यांच्या बॅंक खात्यात तात्काळ पैसे जमा करण्यात यावेत अशी मागणी देखील करण्यात आली. नवोदय विद्यालयामध्ये इतर जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने दाखल होतात त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आणि पात्रता असूनही विद्यार्थ्याना प्रवेशापासून वंचित राहावे लागत असल्याचा मुद्दा देखील बैठकीत उपस्थित करण्यात आला. सभापती सोनाली निकम यांनी या सर्व मुद्यांची गांभिर्याने दखल घेऊन तातडीने कार्यावाही करण्यात येइल असे आश्वासन यावेळी दिले.