
सामना प्रतिनिधी । कुडाळ
सिंधुदुर्गात सध्या वीज मीटरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी दोन दोन महीने पैसे भरूनही वीज मीटरची जोडणी झालेली नाही. महावितरणकडे मीटरच उपलब्ध नसल्याने वीज ग्राहकांना मीटरसाठी दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यातच आता महावितरणची कामे करणा-या ठेकेदारांनीही विविध मागण्या मान्य होईपर्यंत महावितरणची कामे न करण्याचा निर्णय घेतला असल्याने वीज ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
राज्यात सध्या सर्वच ठिकाणी वीज मीटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनी दरवर्षी वीज मीटर खरेदी करते. यंदा वीज मीटर खरेदीचे टेंडर संपले आहे. त्यामुळे मीटर पुरवठा बंद झाला आहे. मंत्रालयीन पातळीवर टेंडर पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र तोपर्यंत वीज मीटरची सर्वत्र मोठी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दोन महिन्यांहून अधिक काळ नवीन मीटरच उपलब्ध नसल्याने बरेच वीज ग्राहक जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. घरगुती तसेच कृषी कनेक्शनची रक्कम भरूनही दोन – तीन महीने उलटले तरी नवीन मीटर उपलब्धतेअभावी नवीन कनेक्शन जोडणी रखडली आहे. जिल्ह्यात हजाराहून अधिक नवीन मीटरची गरज असताना फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच नवीन मीटर देण्यात येतात. त्यामुळे अधिकारी वर्गाचीही कसरतच होत आहे. दर महिन्याला नवीन मीटरची टंचाई भासत असतानाही याकडे गांभीर्याने पाहीले जात नसल्याने वारंवार हि परिस्थिती उद्धवत आहे. जिल्ह्यात मीटरसाठी पैसे भरणा केलेले बरेच ग्राहक जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध करून गैरसोय दूर करावी अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.
वीज मीटरची टंचाई भासत असतानाच आता महावितरणची कामे करणाऱ्या ठेकेदारांनीही आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्याचाही मोठा परिणाम घरगुती व कृषी कनेक्शन जोडणी, ट्रान्स्फार्मर जोडणी व इतर कामांवर मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्राहकांच्या गैरसोयीत आणखी भर पडली आहे.



























































