
सामना प्रतिनिधी । मुंबई
बोरिवली स्थानकात आज एका ४० वर्षीय महिलेचा लोकलला असलेल्या प्रचंड गर्दीने बळी घेतला. सकाळी प्रवाशांनी तुडुंब भरून आलेली लोकल पकडण्याच्या प्रयत्नात अलका पाठारे या लोकल आणि फलाटाच्या गॅपमधून खाली पडल्या. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बोरिवलीच्या नॅन्सी कॉलनीत राहणाऱ्या अलका या वांद्रे-कुर्ला संकुलातील एका राष्ट्रीयकृत बँकेत गेल्या १५ वर्षांपासून कामाला होत्या. मुसळधार पावसामुळे दोन दिवस त्यांना कामाला जाता आले नव्हते. त्यामुळे गुरुवारी पाऊस नसल्याने त्या कामाला जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्या नेहमीच्या वेळेत बोरिवली स्थानकात आल्या. परंतू सकाळी काही लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे फलाटावर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. त्यातच फलाट क्रमांक ३ वर पावणेदहाची चर्चगेट लोकल प्रवाशांनी खच्चून भरून आली. ही चर्चगेट जलद लोकल पकडण्यासाठी पाठारे सरसावल्या.पण गर्दीमुळे लोकलच्या डब्ब्यात चढण्याच्या प्रयत्नात त्या लोकल आणि फलाटामध्ये असलेल्या गॅपमधुन खाली पडल्या. त्यांना जखमी अवस्थेत लगेच शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी अलका यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याचे बोरिवली रेल्वे पोलिसांनी सागितले.





























































