प्रेक्षकांना गृहित धरू नका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

प्रेमाचा रंग प्रत्येक वेळी गुलाबी नसतो, तो काळाही असतो, असे सांगत ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या १६ जुलैपासून ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही नवी मालिका सुरू होत आहे. प्रेमातील विकृती अधोरेखित करणाऱया या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षक संतापले आहेत. डेली एपिसोडच्या नावाखाली प्रेक्षकांना गृहीत धरून काहीही दाखवलेले खपवून घेतले जाणार नाही आणि टेलिव्हिजनच्या सेन्सॉरचे काय झाले, अशी प्रतिक्रिया आणि सवाल प्रेक्षक उपस्थित करू लागले आहेत.

सत्य घटनांवर आधारित ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेत प्रेम प्रकरणातून होणारा मानसिक छळ, हिंसा, खून दाखवण्यात येणार आहेत. सध्या मालिकेचे प्रोमो सतत दाखवले जात आहेत. प्रोमो बघून प्रेक्षक चिडले आहेत. घरातील सर्व सदस्यांसोबत एकत्र बसून बघण्यासारखा हा कार्यक्रम नाही. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे आकडेही धक्कादायक आहेत. अशा स्थितीत टीव्ही माध्यमे जबाबदारी पार पाडण्याऐवजी विकृतीचे उदात्तीकरण करू पाहतात का, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रेमा तुझा ‘विकृत’ रंग!

…वेळीच आवर घाला
टीआरपी वाढवण्यासाठी सनसनाटी मालिका प्राइम टाइममध्ये दाखवण्याकडे वाहिन्यांचा कल वाढत आहे. दरोडे, अपहरण, बलात्कार, सायबर क्राइम, व्यसनं, हिंसाचार अतिरंजित करून दाखवतात. अशा मालिकांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.
-सुहास कुंभार, विक्रोळी

चुकीचा संदेश पोहोचतोय
लोकांना आकर्षित करण्यासाठी ज्या पद्धतीने मालिकेचे प्रोमो बनवले आहेत ते नक्कीच समाजघातक आहेत. कदाचित समाजात काय घडू शकते हे त्यांना मालिकेतून दाखवायचे असेलही… पण प्रोमोतून तरी चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचतोय.
-समृद्धी पोरे, दिग्दर्शिका