
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री व पॉर्न स्टार सनी लिओनीने ‘किरेनजित कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ या वेबसिरीजचा शुक्रवारी ट्रेलर प्रदर्शित केला होता. परंतु सनीचं मूळ आडनाव हे या बेव सिरिजच्या नावासाठी वापरल्यामुळे आता ही वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
सनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज होताच शीख धर्मियांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रवक्ता दिलजीत सिंग या बायोपिकच्या नावात कौर शब्द वापरल्याने त्यावर आक्षेप घेतला आहे. ‘कौर’ या शब्दाला शीख धर्मात खूप मान आणि आदर आहे. सनीनं खूप वर्षापूर्वी तिच मूळ नाव बदलून सनी लिओनी हे नाव धारण केलं आहे,त्यामुळे तिने बायोपिकसाठी कौर ऐवजी लिओनी हेच आडनाव वापरावे अशी सक्त ताकीद सिंग यांनी दिली आहे. कौर आडनाव वापरल्यास शीख धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे तिच्यावर कारवाई केली जावी असंही सिंग म्हणाले आहेत.
सनी लिओनीच्या जीवनावरील वेबसिरीजचा ट्रेलर लॉंच
स्त्री अकाली दलाच्या महिला अध्यक्ष बीबी जागीर कौर यांनीही सनी लिओनीच्या बायोपिकवर टीका केली आहे. ‘सनी लिओनीनं’ कौर हे नाव तिची येणारी बेव सिरीज यशस्वी व्हावी म्हणून वापरल्याचं बीबी जागीर कौर यांनी म्हटलं आहे. सनीचा बायोपिक वेबसिरीजच्या माध्यमातून १६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी हा वाद निर्माण झाल्याने तो प्रदर्शित होईल की नाही याबाबत साशंकता आहे.























































