
सामना प्रतिनिधी । भिवंडी
क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत जीव गमवावा लागलेल्या आपल्या भावोजींच्या हत्येचे भांडवल करून मेहुणा खंडणी उकळत असल्याचे प्रकरण भिवंडीत उघड झाले आहे. यासाठी त्याने भावोजींच्या मित्रालाच ‘बकरा’ बनवून त्याचे अपहरण केले व सवा लाख रुपयांची खंडणी उकळली. या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेणाऱया फिर्यादीमुळे हत्येची ही घटना उघडकीस आली. धक्कादायक म्हणजे हाणामारीत हत्या झालेली असतानाही या मेहुण्याने भावोजींचा घाईघाईत दफनविधी उरकल्याचेही तपासात समोर आले. याप्रकरणी आरोपी मेहुणा शब्बील अन्सारी याच्यासह त्याच्या मित्राला पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. दरम्यान कब्रस्तानात दफन केलेले शव पोलिसांनी तहसीलदारांच्या समोर बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे.
बालाजीनगर परिसरात ८ जुलै रोजी अस्लम अन्सारी, त्याचा मित्र निसार, सलीम आणि फिर्यादी विजय यादव ताडीमाडीच्या अड्डय़ावर बसले होते. यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली. यामध्ये अस्लम बेशुद्ध होऊन खाली पडल्याने सलीमने पळ काढला. तर विजय यादवने बेशुद्ध अवस्थेत अस्लम निसारला रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याने प्राण सोडले होते. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याऐवजी आरोपी मेहुणा शब्बीर अन्सारी याने मृतदेह ताब्यात घेऊन घाईघाईत कब्रस्तानात दफनविधी उरकला. त्यानंतर त्याने विजय यादवला हत्येच्या प्रकरणात गुंतवण्याची धमकी देत पैसे उकळण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याने विजयचे अपहरणही केले. कशीबशी त्यातून सुटका करून फिर्यादी विजयने भोईवाडा पोलीस ठाणे गाठले व कब्रस्तानात दफन झालेल्या या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मेहुणा शब्बीर अन्सारी आणि त्याचा साथीदार सलीम याला अटक केली आहे.
































































