
सामना ऑनलाईन । पेशावर
पाकिस्तानात लवकरच नॅशनल असेंब्ली आणि स्टेट असेंब्लीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या तोंडावरच बलुचिस्तान प्रांतात मस्तुंग येथे प्रचारसभेत काल झालेल्या आत्मघातकी हल्ल्यातील मृतांचा आकडा आज १३० वर गेला आहे. या भीषण धमाक्यांमध्ये २०० जखमी झाले असून त्यापैकी २० जणांची प्रकृती गंभीर आहे. बलुचिस्तानबरोबरच काल दुसरा बाम्बस्फोट खैबर पख्तुनवामध्ये बन्नुम येथे झाला. या स्फोटात पाच जण ठार तर ३७ जण जखमी झाले आहेत. या दोन्ही स्फोटांतील मृतांचा आकडा हा १३५ वर गेला आहे.
या दोन्ही बॉम्बस्फोटांची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.बलुचिस्तान अवामी पार्टीचे नेते सिराज रायसनी यांना निशाणा करून काल दहशतवाद्यांनी मस्तुंगच्या प्रचार रॅलीत आत्मघातकी हल्ला केला. यात कालच १२८ जण ठार झाले. जखमींपैकी दोघांचे आज निधन झाले. या स्फोटांतील मृतांचा आकडा हा १३० वर गेला आहे.
बॉम्बस्फोटांमुळे बलुचिस्तानमधील जनजीवन आज ठप्प झाले. उद्योग, व्यापार बंद होते. सुरक्षा दलांना आजही हाय ऍलर्टचा इशारा देण्यात आला आहे. सध्या प्रचार जोरात सुरू असल्यामुळे देशातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात यावी, अशी मागणी या आत्मघातकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.




























































