
सामना ऑनलाईन । मुंबई
काही दिवसांपूर्वी डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर परिसरात भूकंपसदृश्य हादरे बसले होते. पण, हे हादरे नेमके कशामुळे बसले होते, ते कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, तरीही मुंबईला भूकंपाचे धक्के बसू शकतात, असा अंदाज भारतीय प्रौद्योगिकी संस्थान म्हणजेच आयआयटी मुंबईने वर्तवला आहे. मुंबईतील शिवाजीनगर, गोवंडी, विक्रोळी, पवई, भांडुप या भागांना भूकंपाचा धोका जास्त असल्याचंही आयआयटीने म्हटलं आहे.
डोंबिवली-कल्याण परिसरात बसलेले हादरे हे २.८ रिश्टर स्केल इतके होते. मुंबई हे शहर भूकंपाच्या बाबतीत तुलनेने धोकादायक नसलं, तरी डोंबिवली-कल्याण येथील हादऱ्यांमुळे मुंबईवरही भूकंपाची टांगती तलवार आहे, असं आयआयटीचं म्हणणं आहे. आयआयटीने या भूकंपाचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यांना पनवेलनजीक पृथ्वीच्या पृष्ठभागावर भेगा आढळल्या आहेत. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या पनवेलच्या जवळ असलेल्या मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये भूकंप होऊ शकतो, असा अंदाज सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे.
गेल्या वर्षीही आयआयटीने मुंबईच्या आसपास भूकंपाचा अंदाज वर्तवला होता. काही दिवसांपूर्वी बसलेल्या हादऱ्यांमुळे तो खरा ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता वर्तवलेला अंदाजही खरा ठरू शकतो, अशी भीती वर्तवण्यात येत आहे. कल्याण, भिवंडी परिसरातील हादरे हे कमी रिश्टर स्केलचे असल्याने भूकंपामुळे नुकसान झालं नव्हतं. पण, जर दुर्दैवाने आगामी हादरे जर ५ आणि ५ रिश्टर स्केलपेक्षा जास्त प्रमाणाचे असतील, तर मुंबईत मोठी वित्त आणि जीवितहानी होऊ शकते, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.



























































