
सामना ऑनलाईन । नागपूर
मालाड पूर्व येथील दिंडोशी विभागातील नागरी निवारा परिषद, नवीन म्हाडा वसाहत, संतोष नगर, शिवशाही प्रकल्प, खडकपाडा आदी भागांत लोकवस्ती वाढत आहे. भरदिवसा घरफोडी, विनयभंगाचे प्रकार वाढले आहेत. बीट पोलीस चौकीही बंद असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नवीन विकास आराखडय़ात (डीपी प्लॅन) दोन नवीन पोलीस स्टेशनसाठी जागा आरक्षित ठेवण्याची मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद व आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली. इंदिरानगरमध्ये बीट चौकीत पोलीस नसल्याने चौकी बंद आहे. परिणामी या परिसरातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनी व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दिंडोशी विभागात लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या विकास आराखडय़ात दोन नवीन पोलीस स्टेशनसाठी जागा आरक्षित करण्याची मागणी सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
































































