‘करो या मरो’च्या सामन्यात हिंदुस्थानचे इंग्लंडपुढे २५७ धावांचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | लीड्स

इंग्लंड आणि हिंदुस्थानी संघातील लीड्सच्या तिसऱ्या निर्णायक वनडेमध्ये प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने इंग्लंडसमोर २५७ धावांचे आव्हान ठेवले आहे. कर्णधार कोहलीच्या ७१, शिखर धवन ४४ आणि शार्दुल ठाकूरच्या नाबाद २२ धावांच्या बळावर टीम इंडियाने ५० षटकात ८ बाद २५६ धावा केल्या. इंग्लंडकडून राशिद आणि विलीने प्रत्येकी तीन बळी घेतले तर वूडला एक बळी मिळाला.

धोनी-डिव्हिलिअर्सला जे जमले नाही ते विराटने करून दाखवलं

यजमान इंग्लंडने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. पहिल्या सामन्यातील शतकवीर रोहित शर्मा फक्त २ धावांवर बाद झाला. पहिल्या धक्क्यातून सावरत ५० धावांची भागिदारी केली. परंतु एक चोरटी धाव घेण्याच्या नादात धवन बाद झाला. धवन बाद झाल्यानंतर ठरावीक अंतराने हिंदुस्थानच्या विकेट्स गेल्याने मोठी धावसंख्या रचण्याचे स्वप्न भंग पावले. धोनीने एक बाजू लावून धरत ४२ धावा केल्या परंतु त्यासाठी त्याने ६६ चेंडू खाल्ले. शेवटी शार्दुल आणि भूवीने फटकेबाजी करत हिंदुस्थानला २५० चा टप्पा ओलांडून दिला.

मालिकेतील १-१ अशा बरोबरीनंतर शेवटचा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्यासाठी उभय संघ उत्सुक आहेत. सामन्यापूर्वी हिंदुस्थानी संघाने आपल्या चमूत तीन बदल केले आहेत. लोकेश राहुलच्या जागी दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात आले आहे.तर मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि अनुभवी मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला या लढतीत खेळण्याची संधी टीम इंडियाने दिली आहे. ही लढत आणि मालिका जिंकल्यास हिंदुस्थान सलग दहावा मालिका विजय मिळवणार आहे.