
सामना ऑनलाईन । मुंबई
फॉर्मेलिनच्या वापरावरून गोव्यात झालेल्या कारवाईनंतर आता मुंबईतही अन्न व औषध प्रशासन विभागाने माशांची तपासणी सुरू केली आहे. मुंबईतील वेगवेगळ्या मासळी बाजारातून माशांचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत. मासळी जास्त दिवस टिकवण्यासाठी फॉर्मेलिन नावाच्या केमिकलचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आल्याने एफडीएने ही कारवाई केली आहे.
मुंबईतील मासळी बाजारात इतर राज्यातूनही मोठ्याप्रमाणात मासे विक्रीसाठी आणले जातात. गोव्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मासे दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी फॉर्मेलिन केमिकलचा वापर केला जात असल्याचं आढळून आलं आहे. फॉर्मेलिनमुळे निर्माण झालेल्या वादावरून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बाहेरून येणाऱ्या माशांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईतही फॉर्मेलिन केमिकल वापर केला जातो काय, याची तपासणी करण्यासाठी कफपरेड, क्रॉफडमार्केट आणि इतर ठिकाणी परराज्यातून आलेल्या माशांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेत. एफडीएच्या प्रयोगशाळेत या माशांची तपासणी करून लवकरच याबाबत अहवाल सादर केला जाईल.
दरम्यान, सद्य्यातरी महाराष्ट्रात फॉर्मलिनचा वापर केला जात नाही. राज्यात पावसाळ्यात दोन महिने मासेमारी बंद आहे. त्यामुळे राज्यातील मासळी लोकांना खाण्यासाठी योग्य असून लोकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे मच्छिमार संघटनेचे नेते दामोदर तांडेल यांनी सांगीतलं आहे.
फॉर्मेलिनमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. व्हायरल बातम्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.




























































