
राज्यात येत्या 2 डिसेंबरपासून अद्ययावत अशा ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ संकल्पनेवर आधारित नव्या 108 रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मुंबईतून केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 300 नव्या सुसज्ज रुग्णवाहिका ताफ्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
नागपूर येथे आरोग्यमंत्री आबिटकर पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. रायगड जिह्यातील अलिबाग येथे वाहतूककोंडीत अडकल्याने 20 महिन्यांच्या चिमुकल्याचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याबाबत आरोग्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ योजनेबाबत माहिती दिली.
‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ योजनेत रुग्णवाहिकेत रुग्णाला घेतल्याक्षणीच तिथे आयसीयू बेडच्या धर्तीवर डॉक्टर्स आणि अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणेमार्फत तत्काळ उपचार सुरू होतील, असे आबिटकर यांनी सांगितले.



























































