
सामना प्रतिनिधी । मुंबई
उद्या आषाढी एकादशीला शासकीय पूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानीच ते विठ्ठलाची पूजा करणार आहेत. पंढरपुरात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि लाखो वारकऱयांना फटका बसू नये यासाठीच हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करू देणार नाही, असा इशारा देत मराठा समाजाच्या संघटनांनी राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. मोर्चे, ठिय्या आंदोलनाला सोलापुरात हिंसक वळणही लागले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपुरात न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
‘ते’ शिवरायांचे मावळे नाहीत!
काही संघटनांनी वारकऱयांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे. आपल्या मागण्यांसाठी वारकऱयांना वेठीस धरणेच चुकीचे आहे. या वारीला आणि भागवत धर्माला छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील संरक्षण दिले होते. मात्र आता काही लोक या वारीत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते छत्रपती शिवरायांचे मावळे होऊच शकत नाहीत, असे खडे बोल फडणवीस यांनी मराठा संघटनांना सुनावले आहेत. ते आज पत्रकारांशी बोलत होते.
माझ्यावर दगडफेक करून जर आरक्षण मिळणार असेल तर त्याला मी तयार आहे. पण आरक्षणाचा प्रश्न न्यायालयातूनच सुटू शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोवर मेगा भरती रद्द करावी, अशी मागणीही केली जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असे तत्त्वतः मानून १६ टक्के पदे भरली जाणार आहेत. बॅकलॉग समजून ही आरक्षणाची पदे भरण्यात येतील. मात्र जर ही भरती थांबवण्यात आली तर एससी, एसटी, ओबीसींचे नुकसान होईल. तसेच यामुळे शेवटची संधी असलेल्या मराठा तरुणांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे अशी मागणी करू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.
वारीत चेंगराचेंगरी घडवण्याचा कट
वारीत साप सोडून चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा काहीजणांचा कट असून तसे व्हॉटस् ऍप मेसेज फिरत असल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दहा लाख वारकऱयांच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. मला झेड प्लस सुरक्षा असल्याने मला कोणी हात लावू शकत नाही, पण उद्या पंढरपुरात जीवितहानी झाली तर महाराष्ट्राला कोणीही माफ करणार नाही. म्हणूनच उद्या पंढरपुरात न जाता माझ्या विठ्ठलाची मी घरीच पूजा करेन, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
































































