
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना समांतर असणारा जॉगिंग आणि सायकल ट्रक पालिका लवकरच बांधणार आहे. यामध्ये १२ किमी लांबीचे सायकल-जॉगिंग ट्रक तर ३.८० किमीवर पालिका गार्डन, विद्युत रोषणाई, संरक्षक भिंत अशी कामे केली जाणार आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जलवाहिन्यांपासून १० मीटरपर्यंतचे बेकायदा बांधकाम हटवण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. यामध्ये मोकळ्या होणाऱ्या ३६ किमी मुख्य जलवाहिन्यांलगत पालिकेला ही विकासकामे करावयाची आहेत. यासाठी ९४ कोटी ६६ लाख ५७ हजार ४२८ रकमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. तथापि दिलेल्या निविदेनुसार पालिका प्रशासनाने कंत्राटदाराशी केलेल्या वाटाघाटीनंतर मे. स्काय वे इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि.ने हे काम ९३,५४,८६,८७०.३५ इतक्या रकमेत करण्यास सहमती दर्शवल्यामुळे हे काम संबंधित कंपनीकडून करून घेण्यासाठी पालिका प्रशासनाकडून स्थायी समितीत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या कामाचा एकूण खर्च १,१९,८६,२०,६१७ इतका आहे.
असा होणार प्रकल्प
पालिकेच्या जल अभियंता खात्यातील एन (घाटकोपर), एम पश्चिम (चेंबूर), एच पूर्व (बिकेसी), एफ दक्षिण या भागात सायकल-जॉगिंग ट्रक उभारण्यात येतील. शिवाय दोन्ही बाजूला विविध प्रकारची झाडे लावण्यात येतील. याशिवाय आकर्षक विद्युत रोषणाईदेखील करण्यात येईल.





























































