
सामना प्रतिनिधी, मुंबई
लोकलची गर्दी आणि महागडी टॅक्सी टाळण्यासाठी प्रवासी ओला, उबरचा आधार घेतात पण त्या सेवाही महागात पडू शकतात असे एका घटनेतून उघड झाले आहे. उबरचा एक ड्रायव्हर प्रवाशाला पिकअप न करताच कॅब घेऊन मुंबईभर फिरत राहिला आणि त्याचे बिल मात्र त्या प्रवाशाच्या अकाऊंटमधून वळते केले.
प्रेषित देवरुखकर या मराठी प्रवाशाला उबरचा हा विचित्र अनुभव आला. ‘उबर’च्या अॅपवरून त्यांनी मालाड येथून कार बुक केली होती परंतु ड्रायव्हरने त्यांना पिकअप न करताच राइड सुरू केली. अॅपवर देवरुखकर यांच्या ते लक्षात आले. ड्रायव्हर कदाचित परत येईल असे त्यांनी गृहीत धरले परंतु ड्रायव्हर परतलाच नाही. त्याचा फोनही नॉट रिचेबल लागत होता. अखेर देवरुखकर यांनी ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवरून त्या उबर कॅबला टॅग करत ट्वीट करायला सुरुवात केली.
कॅबचालक बिनधास्त मुंबई फिरत होता आणि त्याचे बिल देवरुखकर यांना द्यावे लागणार होते. त्यामुळे ते संतापले. कॅबच्या लोकेशनचे फोटो देवरुखकर यांनी ट्विटरवरून उबर कंपनीला पाठवायला सुरुवात केली. अॅपवर संबंधित ड्रायव्हरचे नाव फक्त ‘पी’ असे देण्यात आले होते. असे नाव उबर कंपनी कसे स्वीकारते, असा सवालही त्यांनी ट्विटरवर ‘उबर इन सपोर्ट’ या अकाऊंटवर केला.
‘मालाड पश्चिम येथून पिकअप होते पण कॅबचालक उत्तर मुंबईत गेला आहे. कदाचित तेथील खाडीमध्ये काही तरी टाकायला गेला असेल’ असे ट्विटही संतप्त देवरुखकर यांनी केले. ‘तो गाडीतून कुणाचा तरी मृतदेह सोडायला गेला आहे’ असेही ट्विट त्यांनी केले. मुंबईत बरीच भटकंती केल्यानंतर उबर चालकाने ‘राइड’ संपवली पण त्यानंतर देवरुखकर यांच्या खात्यातून ८५७ रुपयांपेक्षा जास्त पैसे कापले गेले. त्यासंदर्भात त्यांनी तक्रार केल्यानंतर उबर कंपनीने त्यांचे पैसे परत देण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र इतक्या ट्विटनंतरही कंपनीकडून चालकाच्या चुकीबद्दल माफी मागितली गेली नाही ही शरमेची बाब आहे.
























































