१५ हिरे व्यापाऱ्यांना सात कोटींचा गंडा घालणारा अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील एका माणसाने १५ हिरे व्यापाऱ्यांना ७ कोटींचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. बीकेसी पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवल्यानंतर शनिवारी त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. सिद्धार्थ (३४) असं या चोराचं नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हा अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील रहिवासी असून तो वाणिज्य शाखेतील पदवीधर आहे. सिद्धार्थचे बीकेसी येथे ‘दीप्ती डायमंड्स’ नावाचं एक भाड्याचं दुकान आहे. त्याने १५ हिरे व्यापाऱ्यांकडून ७ कोटींचे हिरे खरेदी केले होते. परंतु त्याचे पैसे न देताच सिद्धार्थने बीकेसी येथील दुकान बंद करून पळ काढला होता.

आपली फसवणूक झाल्याचं समजताच हिरे व्यापाऱ्यांनी सिद्धार्थविरोधा बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर फब्रुवारीपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. त्यांनी सिद्धार्थची सगळी बँक खाती सील केली होती. अखेरीस शनिवारी घरच्यांशी बोलण्यासाठी जेव्हा सिद्धार्थने स्वत:चा फोन सुरू केला, तेव्हा त्याच्या फोनच्या लोकेशनवरून त्याचा शोध घेतला गेला आणि त्याला पकडण्यात आलं.