
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईत राज्य सरकार, केंद्र सरकारच्या आस्थापनांच्या मराठी भाषेत लिहिलेल्या नामफलकांमध्ये नजरचुकीने व्याकरणाच्या चुका बऱ्याच असतात. मात्र, भाषेचा अभिमान आणि भाषेसाठी झटणाऱ्या काही मोजक्या कार्यकर्त्यांमुळे या चुका सुधारल्या जातात. बांद्रा पोलीस ठाणे तसेच विले पार्ले स्थानकाचे नामफलक आता व्याकरणिकदृष्टय़ा सुधारणार आहे. या पुढे बांद्रा पोलीस ठाण्याचे वांद्रे पोलीस ठाणे तर विले पार्ले असे दोन वेगवेगळे शब्द आता विलेपार्ले असे एकत्र लिहिले जाणार आहेत. याबाबतचे आदेश मराठी भाषा विभागाने काढले आहेत.
ग्रॅण्ट रोडचे रहिवासी नंदकुमार साळवी यांच्या लक्षात या चुका आल्या. त्यांनी मंत्रालयातील मराठी भाषा विभाग, पश्चिम रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक तसेच वांद्रे पोलीस ठाण्याचे अधिकारी व मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करून त्याबाबत पाठपुरावा केला. संबंधित विभागाच्या ही चूक लक्षात आणून दिली. मराठी भाषा विभागाच्या अवर सचिवांनी हे नामफलक योग्य पद्धतीने लिहिण्याचे आदेश जारी केले आहेत. कोणतीही अपेक्षा न करता केवळ मराठी भाषेसाठीचे त्यांचे कार्य राज्य सरकारच्या डोळ्य़ात झणझणीत अंजन घालणारे आहे.
मराठी भाषेमध्ये योग्य ते नामफलक लावलेच गेले पाहिजे. मराठी माणसाचा हा हक्कच आहे. त्यासाठी पाठपुरावा करणे हे मराठी माणसाचे कर्तव्य आहे. सरकारने याबाबतचे आदेश दिले आहेत. परंतु अशा चुका होणारच नाहीत, याची काळजी सरकारने आणि संबंधित संस्थांनी घेतली पाहिजे, असे नंदकिशोर साळवी यांनी सांगितले.































































