रुपयाची घसरण सुरूच; कार, टीव्ही महागणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dollar-vs-rupee

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काही वस्तूंच्या जीएसटीमध्ये नुकतीच कपात करण्यात आल्याने टीव्ही आणि कारच्या किंमती कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची किंमत सातत्याने घसरत असल्याने व जीएसटीच्या कपातीमुळे सामान्यांना कोणताच फायदा होणार नसल्याचे दिसत आहे. रुपयाच्या घसरणीमुळे टीव्ही, कार यासारख्या वस्तूंच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या आयातीसाठी जास्त भूर्दंड सोसावा लागणार असल्याने या वस्तू महागणार आहेत.

अमेरिका-चीनमधील व्यापार संघर्षामुळे अमेरिकेत व्याजाचे दर वाढल्याने डॉलर मजबूत झाला आहे. मात्र, काही महिन्यांपासून रुपयाचे मूल्य सातत्याने घसरत आहे. सध्या एका डॉलरची किंमत ६९.१ रुपये आहे. रुपयाची सध्याची स्थिती पाहता आयात महाग होणार आहे. त्यामुळे घरगुती उपकरणांच्या किंमतीही वाढणार आहेत. आम्ही रुपयाच्या घसरणीच्या परिणामावर लक्ष ठेवून आहोत. अनेक वाहन उत्पादक कंपन्या परदेशातून सुटे भाग मागवून देशातच कार बनवतात. या सुट्या भागांच्या आयातीचा खर्च वाढणार आहे. खरेदीसाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर डॉलरवर अवलंबून रहावे लागते. डॉलर मजबूत झाल्याने आयातखर्च वाढणार आहे.

कारप्रमाणेच परदेशातून सुटे भाग मागवून देशात बनवण्यात येणाऱ्या घरगुती वस्तूंच्या किंमतीतही वाढ होणार आहे. त्यात टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज यासारख्या अनेक वस्तू आहे. जीएसटीतील दरकपातीमुळे काही वस्तू सामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता होती. मात्र, रुपयाच्या घसरणीमुळे कार, टीव्ही यासारख्या घरगुती वापराच्या वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.