मोदींविरोधात लोकसभेत हक्कभंग, राफेल डीलबाबत सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

फ्रान्स सरकारसोबत झालेल्या राफेल डीलबाबत लोकसभेत दिशाभूल केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर करत आज काँग्रेसने त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव मांडला. पंतप्रधानांवर हक्कभंग आणला जात असल्याचे पाहून मग दुसरीकडे भाजपनेही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हक्कभंग बजावला आहे. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांचेही अविश्वास प्रस्ताव चर्चेला आणण्याबाबत आपण लवकरच निर्णय घेऊ असे सांगितले.

लोकसभेत अविश्वास ठरावावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर राफेल डीलबाबत खळबळजनक आरोप केले होते. या डीलमध्ये ४५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी लावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान व संरक्षणमंत्री सीतारामन यांनी हा करार काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या कार्यकाळात झाला होता. त्यावेळची गोपनीयतेची अट आमच्या सरकारने पाळली आहे असा दावा केला होता. या दाव्याची पोलखोल करत माजी संरक्षणमंत्री ए. के. ऍण्टोनी यांनी मोदींच्या भाषणातील हवा काढून घेतली होती. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसने आज पंतप्रधानांवर हक्कभंग आणला.

काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांविरोधात तर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संरक्षणमंत्र्यांविरोधात हक्कभंग मांडला. भाजपकडून अनुराग ठाकूर व निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला.

शेगावला रेल्वेगाडीला थांबा देण्याबाबत रेल्वेमंत्री राजी नाहीत
‘शेगावीचा राणा गजानन’ अशी गजानन महाराजांची सर्वदूर ख्याती असली तरी हिंदूंच्या दृष्टीने पवित्र स्थान असलेल्या शेगाव केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या खिजगणतीतही नसल्याचे दुर्दैवी चित्र आज लोकसभेत स्पष्ट झाले. शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी शेगावला येणाऱया भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन तिथे रेल्वे थांबा द्यावा अशी मागणी केली होती. मात्र दुसऱया स्टेशनवरून गाडी येते की नाही याची खातरजमा करवी लागते असे सांगत शेगावला रेल्वे थांबा देण्यास असमर्थतता व्यक्त केली.

पंढरपूरला पवित्र क्षेत्राचा दर्जा द्या, शिवसेनेची मागणी
पंढरपूरला पवित्र तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन सर्वांगीण विकास करावा अशी मागणी शिवसेनेने आज केली. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. प्रतिवर्षी पंढपुरात भक्तीचा महाकुंभ भरतो याकडे सभागृहाचे लक्ष वेधत त्यासाठी सरकारने कुंभमेळय़ाला ज्या दर्जाच्या सुविधा दिल्या जातात तशा सुविधा निवास, वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्याव्यात तसेच भारतीय पुरातत्व खात्याअंतर्गत राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांच्या अनुषंगाने, पवित्र क्षेत्राचा (शहराचा) दर्जा दिला जाऊ शकतो याकडे लक्ष वेधत विठुरायाच्या पंढरीला हा दर्जा तातडीने द्यावा अशी मागणी प्रश्नोत्तराच्या तासांत केली. त्यावर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी याप्रकरणी सरकार सकारात्मक पावले उचलेल असे आश्वासन दिले.