संस्कार… कथेचा… साहित्याचा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनुराधा राजाध्यक्ष, [email protected]

गणेश मतकरी… हॉलिवूड चित्रपटांचं उत्तम समीक्षण ही त्यांची ओळख असली तरी साहित्यातील कथाप्रातांतही गणेशची लेखणी वडिलांचा वारसाहक्क दाखवते…

मूळात माझं काही इन्टेन्शन नव्हतं लेखक व्हायचं… माझ्यावर वाचनाचे संस्कार खूप झालेत लहानपणापासूनच… कारण आजोबा (पप्पा) माधव मनोहर नाटय़समीक्षक… खूप पुस्तकं होती त्यांच्याकडे… मराठी, इंग्रजी… बाबा, रत्नाकर मतकरी… त्यांच्याकडेही खूप पुस्तकं.. मी मराठी शाळेत होतो… त्यामुळे इंग्रजी वाचनाचं तेवढं एक्सपोजर मिळालं नाही मला… पाचवीनंतर इंग्लिश भाषा इन्ट्रोडय़ुस झाली आणि इंग्लिश वाचन दहावीनंतर सुरू झालं… मग इंग्रजीच वाचलं… नंतरची दहा-बारा वर्षे मराठी वाचन जवळजवळ थांबलंच… पण त्याआधी या दोघांकडची पुस्तकं वाचली. शिवाय मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, वसंत वाचनालय असा कुठल्या ना कुठल्या वाचनालयाचा मेंबर होतो मी… वाचनाबरोबरच नाटकाच्या तालमी बघणं, बालनाटय़ात काम करणं यामुळे आणि पपांमुळे अॅनालिटीकल दृष्टिकोन डेव्हलप होत होता. बाबा त्यांचं लिखाण घरात आधी वाचायचे. मी, आई आणि सुप्रिया ऐकायचो. प्रत्येकाला डिस्कशनमध्ये भाग घ्यायला मुभा होती. लहान होतो तरी आमच्या विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचे बाबा. आई तेव्हा हिंदी आणि बाबा इंग्लिश चित्रपट दाखवायचे. त्याचेही संस्कार होतच होते माझ्यावर, पण तेव्हा कधीच वाटलं नाही लिहावंसं. उलट चौथी-पाचवीपासूनच आर्किटेक्ट व्हायचं हे मात्र ठरवलं होतं मी. पुढे आर्किटेक्ट झाल्यावर गोव्याला काम करत होतो दत्तराज साळगावकरांचं तेव्हा वास्कोला त्यांच्या ऑफिसमध्ये इंग्लिश पुस्तकांचं प्रचंड कलेक्शन होतं. साईटवरचा स्टोअर किपर तिकडून माझ्यासाठी पुस्तक आणायचा. तिथेही खूप वाचन झालं. ९६ साली परतलो आणि पल्लवीशी लग्न झालं. माझ्याच कॉलेजमध्ये होती ती.

पल्लवी तिथेच बसली होती. मी चहा-कॉफी पीत नाही म्हणून ती ताक घेऊन आली होती आणि आमच्या गप्पा ऐकत होती. लेखकाच्या घरात जन्माला येऊन आणि आजोबांपासून लेखनाचा वारसा घरात असून गणेशला लेखणी हातात घ्यावीशी वाटली नाही. मग त्याच्या लिखाणाला सुरुवात झाली, कधी आणि कशी या माझ्या मनातल्या प्रश्नाला त्यानं ओळखलं असावं म्हणूनच तो पुढे म्हणाला, ‘आर्किटेक्चरला होतो तेव्हा काम फत्ते’, ‘बेरीज वजाबाकी’सारख्या मालिकांना मी बाबांना असिस्ट करत होतो. या प्रॅक्टिकल अनुभवांमुळे चित्रपट माध्यमाबद्दल माझा इंटरेस्ट वाढत गेला. त्या सुमारास, महानगरमध्ये जे चित्रपटाबद्दल समीक्षण लिहून येत होतं, ते काही संदर्भात मला खटकत होतं. निखिल वागळे तेव्हा बाबांकडे येत जात होते. त्यांच्यासमोर जेव्हा मी हे म्हणालो, तेव्हा त्यांनी मलाच विचारलं की तूच का नाही लिहित? आणि मग मी चित्रपट समीक्षण लिहायला सुरुवात केली.

नंतर वाटायला लागलं की आपण फक्त चित्रपट समीक्षा आणि चित्रपट यावरच लिहितोय…’

मला हव्या त्याच मुद्दय़ाकडे तो येत होता… ‘सिनेमॅटिक’, ‘चौकटीबाहेरचा सिनेमा’, ‘सिनेमास्केप’ या पुस्तकांनंतर ‘खिडक्या थोडय़ा उघडय़ा’ या पुस्तकाची जन्मकथा मला ऐकायची होती. बऱयाचदा एखादा लेखक एखाद्या विषयाला अनुसरून लिहायला लागला की, त्याच्याकडे तशाच प्रकारच्या लिखाणाची मागणी होते. गणेशच्या बाबतीतही तसंच होण्याची शक्यता असताना त्याला स्वतःलाच त्याची जाणीव झाली आणि आधुनिक युगातल्या, आजच्या समाजातल्या आपल्या आजूबाजूला वावरणाऱया लोकांबद्दल, त्यांच्या आयुष्यातल्या घटनांबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल आणि नातेसंबंधातल्या उडत जाणाऱया विश्वासाबद्दल लिहिण्यासाठी त्याची लेखणी सरसावली. ज्याला आधी लेखणीच हातात घ्यावीशी वाटत नव्हती, त्याच्यातच नंतर समीक्षणात्मक लिखाण करताना कथा लिखाणाची उर्मी कशी निर्माण झाली याची उत्सुकता वाटत होती मला.

गणेश म्हणाला ‘पहिल्यापासूनच पप्पांचा (माधव मनोहर) समीक्षेचा वारसा मी चालवणार आणि बाबांचा वारसा सुप्रिया चालवणार असं सगळय़ांनाच वाटत होतं. काही काळानंतर समीक्षणात्मक लिहित असताना मला जाणवलं की, माझ्या आजूबाजूला घडणाऱया गोष्टी माझ्या वाचनात येतच नाहीयेत. म्हणून मग अशा घटनांबद्दल लिहावंसं वाटलं. मी जे वाचत होतो त्याच्यात मध्यमवर्गीयांचा जो ट्रान्झिशनल पिरीयड आहे, त्यांचे त्यांच्या मुलांबद्दलचे जे विचार आहेत किंवा त्यांच्या मुलांची बदलती मानसिकता आहे त्याचं चित्रण दिसत नव्हतं. टेक्नॉलॉजीमुळे माणसांमध्ये आलेलं आयसोलेशन, मोठय़ा फॅमिलीतून स्वतंत्र फॅमिलीचा आलेला ट्रेंड, स्वतःचा शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न, हे मिडलक्लासमध्ये जे बदल होत गेले ते जे मी वाचत होतो त्यात मला दिसत नव्हते. म्हणूनच मग मी पहिली गोष्ट लिहिली ‘ब्रेक’. त्यातलं कपल लिव इन रिलेशनशिपमध्ये आहे. त्यातली दोन प्रमुख पात्रं जी आहेत त्यांचे तपशील मी आणि माझी बायको यांचे बायोग्राफिकल तपशील आहेत. आम्ही राहत होतो तिथलं वातावरण त्यात उतरलं आहे. ती गोष्ट मी बाबांना वाचून दाखवली. तेव्हा त्याची कादंबरीही होऊ शकते असं त्यांना वाटलं. पण मला ती कथा स्वरूपातच असावी असं वाटलं आणि अशाच प्रकारच्या कथा अजून लिहाव्यात असंही वाटलं. ते आग्रही होते ते कथा प्रकाशित करण्याबद्दल. अनुभव मासिकामध्ये सुहास कुलकर्णी यांनी या कथा प्रकाशित केल्या. ही एक कथा मालिका होती. ‘खिडक्या थोडय़ा उघडय़ा’ हे त्याचंच पुस्तक रूप. ते सलग जर वाचलं तर या पुस्तकातल्या कथांचा इम्पॅक्ट कादंबरीचा आहे असंच वाटतं. कारण त्या कथा वेगळय़ा असल्या तरी त्या एका घटनेभोवती गुंफलेल्या आहेत. मग मला हे जाणवलं की रत्नाकर मतकरींनी या कथेची कादंबरी होईल असं जे मत ‘ब्रेक’ कथा वाचून व्यक्त केलं होतं तो त्यांचा जाणता अनुभवी विचार, प्रत्यक्ष तसाच्या तसा नाही, तरी अंतिमतः त्याच प्रकारे, फक्त एक वेगळा फॉर्म घेऊन आकाराला आला होता.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गणेशनंसुद्धा हे म्हटलं आहे की, हे पुस्तक कथा-कादंबरीच्या सीमारेषेवरचं आहे… या सगळय़ा कथांचा बॅक ड्रॉप आर्किटेक्चरल आहे… मुंबईमध्ये शहरीकरणामुळे अर्धवट इंग्रजी, मराठी भाषेची असणारी भेसळ बोलतात, ती भाषा यात आहे. इतका वेळ आमच्या गप्पा ऐकणारी पल्लवी म्हणाली ‘काही जणांचा आक्षेप आहे या भाषेवर, पण ती आजच्या युगातली भाषा आहे. हे पुस्तक वाचून एका ८० वर्षांच्या आजीनं फार सुंदर प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या की, ‘माझी नातवंडं कसा आणि काय विचार करतात हे मला या पुस्तकामुळे कळलं आणि त्यामुळे त्यांना समजून घेणं आता मला सोपे जात आहे.’

‘जशी माणसं असतात तशीच त्यांची घरंसुद्धा असतात. यामुळे घर डिझाइन करताना आम्ही त्या त्या व्यक्तीशी बोलूनच ते घर डिझाइन करतो. कारण त्या व्यक्तीचा विचार त्याच्या घराच्या डिझाइनमध्ये उतरत असतो.’ हे गणेशचं घराबद्दलचं मत. थोडक्यात, माणसांच्या स्वभावाचं प्रतिबिंब त्याच्या घराच्या रचनेत असतं, हे गणेशचं मत होतं आणि ‘तुझ्या घरातल्या तुझी सर्वात आवडती जागा मला दाखव’ असं मी त्याला जेव्हा म्हणाले, तेव्हा त्यानं मला त्याच्या स्टडीत पुस्तकांच्या सोबतीने बसवलं. यावरूनच त्याचं व्यक्तिमत्त्व माझ्यासमोर स्पष्ट झालं.