
सामना प्रतिनिधी, लातूर
मराठा समाजाने राज्य सरकारला २० मागण्यांचे निवेदन याआधीच दिलेले आहे. त्यामुळे आता आम्हाला कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही आणि सरकारसोबत चर्चाही होणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वय समितीने आज स्पष्ट केली. सरकारशी चर्चेसाठी गेलेल्यांचा मराठा आंदोलनाशी संबंध नाही, असे जाहीर करून त्यांचा निषेधही या बैठकीत नोंदवण्यात आला. सर्वच आंदोलनांतील गुन्हे बिनशर्त मागे घेण्याच्या मागणीसाठी येत्या क्रांतीदिनी ९ ऑगस्टला गावोगाव जनआंदोलन उभारले जाईल. शाळा, कॉलेजेसच नाही, तर सरकारी कार्यालयेही बंद केली जातील. गावागावांतील मराठा समाज गुराढोरांसह रस्त्यावर उतरलेला असेल. त्याआधी १ ऑगस्ट रोजी मराठा समाजातील खासदार, आमदारांच्या घरांसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
लातुरातील राहिचंद्र मंगल कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक रविवारी झाली. त्यानंतर समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत विविध ठरावांची माहिती दिली. मुंबईत ९ ऑगस्ट २०१७ रोजी झालेल्या मोर्चातच २० मागण्यांचे निवेदन सरकारला दिले आहे. आता सर्वच आंदोलनांतील गुन्हे बिनशर्त मागे घेण्याच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राज्यात गावोगाव गुराढोरांसह समाज रस्त्यावर उतरणार आहे. या आंदोलनात काही उद्रेक झाल्यास त्याची जबाबदारी शासनावर असेल, असेही स्पष्ट करण्यात आले. तसेच १ ऑगस्टला राज्यातील मराठा खासदार, आमदारांच्या घरांसमोर ठिय्या आंदोलन करण्याचेही बैठकीत ठरले. राज्यातील सर्व जिल्ह्यांचे समन्वयक बैठकीला उपस्थित होते. ते आता त्यांच्या जिल्हय़ात आंदोलनाची माहिती देणार आहेत.
इतर मागण्या व निर्णय
आंदोलनातील शहीदांच्या वारसांना ५० लाखांची मदत, कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी द्या
काकासाहेब शिंदे, तोडकर यांच्या मृत्यूस कारणीभूत अधिकाऱयांची एसआयटी चौकशी करून गुन्हे नोंदवा.
विधानसभा व विधान परिषदेचे विशेष अधिवेशन बोलवा.
आरक्षण मिळेपर्यंत सरकारशी असहकार आंदोलन.
कोणताही कर भरला जाणार नाही.
परभणीमध्ये समन्वयकांची पुढील बैठक होणार.
सरकारसोबत चर्चेस गेलेल्यांशी संबंध नाही
सरकारला निवेदन दिलेले आहे. त्यामुळे आता कोणाची मध्यस्थी किंवा कोणतीही चर्चा आम्हाला मान्यच नाही. जे कोणी सरकारसोबत चर्चेसाठी गेले आहेत त्यांचा या बैठकीत जाहीर निषेध करण्यात आला आहे. त्यांचा या आंदोलनाशी संबंध राहणार नाही, असेही समन्वय समितीने जाहीर केले.
आरक्षणासाठी नांदेड जिह्यात फाशी घेऊन आत्महत्या
अर्धापूर – ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून आणि त्यासाठी आत्महत्या करत असल्याचे नमूद करून दाभड येथील कचरू दिगंबर कल्याणे (४०) यांनी आज दुपारी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. कचरू हे उच्चशिक्षित असून मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. आई, पत्नी व तीन मुली असे त्यांचे कुटुंब आहे.
राजू शेट्टींना कोल्हापुरातून पळवून लावले
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांची भेट घ्यायला गेलेल्या राजू शेट्टी यांना संतप्त आंदोलकांनी पळवून लावले. शेट्टी बाहुबलीचे दर्शन घ्यायला जात असताना त्यांनी हातकणंगले येथे जाऊन मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांची भेट घेतली. मात्र आंदोलकांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. खासदार शेट्टी हे आंदोलनस्थळी पोहोचताच मराठा समाजातील तरुणांच्या भावनांचा उद्रेक झाला. बाहुबलीला जाता जाता मराठा मोर्चाला भेट देण्याचे नाटक कशाला करता, असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी यावेळी केला. तुमची फुकटची सहानुभूती आम्हाला नको. तुम्ही परत जा म्हणत त्यांनी राजू शेट्टींना आंदोलन स्थळावरून पिटाळून लावले.





























































