
सामना प्रतिनिधी । कर्जत
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेकडून नगरपरिषदेचे सफाई कामगार यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी नगरपरिषदेस वसुंधरा पुरस्कार मिळाल्या बद्दल मुख्याधिकारी रामदास कोकरे यांचाही सत्कार करण्यात आला. कर्जत शहरातील शिवसेनाच्या मध्यवर्ती कार्यालयात या सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व सफाई कामगारांचा जीवन विमा शिवसेनेकडून काढण्यात आला.
यावेळी कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे म्हणाले की कर्जत नगरपरिषदेला वसुंधरा पुरस्कार मिळाला ही अभिमानाची बाब आहे, नगरपरिषद हद्दीत घनकचरा व्यवस्थापन अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये नागरिक आणि लोकप्रतिनिधींचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. त्यामुळेच हे शक्य झाले आहे.
कर्जत नगरपरिषदेला वसुंधरा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याधिकारी रामदास कोकरे आणि आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे यांचा तर कर्जत नगरपरिषद हद्दीत स्वच्छता राखणारे नगरपरिषदेचे सर्व सफाई कामगार यांच्या सत्कार करण्यात आला. नगरसेविका सुवर्णा जोशी यांनी नेहमी पडद्याच्या समोरच्या व्यक्तीचा सत्कार होतो मात्र पडद्याच्या मागे असणारे स्वच्छता दूत म्हणजेच सफाई कामगार यांचा सत्कार होणे क्रमप्राप्त आहे म्हणून सर्व सफाई कामगार यांचा सत्कार करण्यात आला आहे. ७५ सफाई कामगारांना सुरक्षा कवच म्हणून त्यांचा मयूर जोशी आणि सुवर्णा जोशी यांनी विमा काढला आहे आणि त्या विम्याचा पहिला हप्ता आम्ही भरणार आहोत असे सुवर्णा जोशी यांनी सांगितले.
दरम्यान, याप्रसंगी सुदेश देवघर, केतन जोशी शैलेश दगडे, आबा देशमुख आदींसह नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

































































