
सामना प्रतिनिधी । राहुरी
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील राहुरी स्थानक, ब्राम्हणी भागातील कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कृषी विभागाचे अधिकारी तसेच कृषी सहाय्यकांची धावपळ उडाली आहे. तर कपाशी उत्पादक शेतकरीही धास्तावला आहे. गेल्या वर्षी राज्यातील कपाशीच्या पिकांवर ५ डिसेंबरला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा पुर्व भागात जुलै महिन्यातच बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळल्याने शेतकरी धास्तावले आहेत. राहुरी व देवळाली प्रवरा मंडलमध्ये मोठ्या क्षेत्रात कपाशीचे पीक घेतले जाते. राहुरी तालुक्यात यावर्षी ९ हजार ६७० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.
बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे लक्षणे कपाशीच्या पिकावर आढळून आल्याने कृषी विभागाकडुन उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या कामगंधा सापळ्याला मागणी वाढली आहे. पंधरा दिवसात राहुरी तालुक्यातील शेतकऱ्याांनी ३ हजार कामगंधा सापळ्याची खरेदी केली आहे. बोंडअळीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने कपाशी पेरणीसाठी १ जूनचा सल्ला दिला होता. मात्र, लवकर पेरणी केल्यास उत्पन्न वाढेल, या आशेने काही भागात १५ ते २० मे दरम्यान कपाशीची लागवड करण्यात आली. लवकर लागवड झालेल्या कपाशी पिकांवर बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळुन आला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राहुरी कृषी विभागासह भारत मौसम विज्ञान विभागाच्या शास्त्रज्ञांनही शेतकऱ्यांना सल्ला देत आहेत.
प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना
- कामगंधा सापळा – गौसी लुर या केमीकलचा मादी सदृश्य गंध तयार करून कामगंधा सापळ्यात नराला अडकवण्यात येते. नर अडकत असल्याने प्रजनन संपुष्टात येऊन प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होते.
- कपाशीच्या एक एकर शेतात ५० मिटरच्या अंतरावर ८ ते १० कामगंधा सापळे लावावेत.पिकावर डोमकळ्या दिसुन आल्यास त्या तोडुन आतील आळीसह नष्ट कराव्यात.
- कपाशीच्या पिकावर निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी. प्रति सापळ्यात ८ ते १० पतंग किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त हिरवी बोंडे जिवंतअळी आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी ओळखून पिकावर किटक नाशकाची फवारणी करावी.
- कपाशीच्या पिकावर होणारा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या ठिकाणी कपाशी पिक एक ते दीड महिन्याचे झाले तेथे फुलकिडे,मावा,तुडतुडे,पांढरी माशी या रस शोषणा-या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी किटक नाशकाची फवारणी फवारणी करावी.तसेच रस शोषणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी मिश्र पिक,आंतरपिक,सापळा पिके म्हणुन मका, चवळी,झेंडुची लागवड करावी. बी.टी.कापूस बोंडअळीला प्रतिकारक्षम राहण्यासाठी बी.टी.कपाशीच्या सभोवताली २० टक्के बिगर बी.टी.संकरीत वाणाची लागवड करावी.
































































