भाजपच्या ‘बॉस’ला बसणार दणका? प्रवाशानं गाडीचा फोटो केला ट्विट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्याच्या परिवहन विभागाच्या नियमांना न जुमानता आपला रोख झाडण्यासाठी नंबर प्लेट स्टाईलमध्ये लिहिण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत. अशाच एका नंबर प्लेटचा फोटो एका प्रवाशानं ट्विटरवर टाकला ज्यावर भाजपचं निवडणूक चिन्ह कमळ आणि ‘बॉस’ दिसेल अशा पद्धतीने आकडे लिहिले आहेत. मुंबई पोलिसांनी ही गाडी कुठे पाहिली अशी डिटेल्स मागवली आहेत.

गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी परिवहन मंडळाने नंबर प्लेट संदर्भात नियमावली तयार केली आहे. या नियमावली नंतर नंबर प्लेटवर आकडे दिसतील अशाच पद्धतीने लिहिण्याचे आदेश आहेत. मात्र हे आदेश सर्रास धुडकावून लावले जात आहे. सत्ताधारी पक्षाचे चिन्ह असलेल्या गाडीवर अशी नंबर प्लेट दिसल्यानंतर एका दक्ष प्रवाशानं फोटो ट्विट केला. तसेच मुंबई पोलीस, मुंबई ट्रॅफिक पोलीसच्या हँडलला टॅग केला. यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ रिप्लाय देत निश्चित ठिकाणाची विचारणा केली. मात्र गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो असताना ठिकाणाची गरज काय असा प्रश्न या प्रवाशानं केला. त्याला अन्य नेटकऱ्यांनी देखील साथ दिली असून गाडीच्या नंबर प्लेटवरून मालकापर्यंत पोहोचता येते तर ठिकाण सांगण्याची आवश्यकता काय असा सवाल केला. मात्र यावर मुंबई पोलिसांच्या हँडलवरून कोणतेही उत्तर आलेले नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून कारवाई केली जाणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे.