मराठा क्रांतीचे मराठा आमदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। लातूर

मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या मागण्यांप्रती निष्क्रीय असलेल्या मराठा समाजाच्या आमदार, खासदारांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चा ठिय्या आंदोलन १ ऑगस्ट पासून करणार असे जाहिर करण्यात आले होते. त्यानुसार या आंदोलनाची सुरुवात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोरच्या आंदोलनाने होणार आहे असे जाहिर करण्यात आले आहे.

लातूरमधील एलआयसी कॉलनी भागातील पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर १ ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजल्यापासून हे आंदोलन करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलन चालणार आहे. यावेळी घंटानादही करण्यात येणार आहे, तसेच पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा निषेध करण्यात येणार आहे.

२ ऑगस्ट रोजी आमदार अमित देशमूख यांच्या बाभळगाव येथील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे. ३ ऑगस्ट रोजी आमदार त्र्यंबक भिसे यांच्या लातूरातील विशाल नगर येथील घरासमोर आंदोलन होणार आहे. ४ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांच्या महाराष्ट्र गृहनिर्माण सोसायटीमधील निवासस्थानासमोर आंदोलन होणार आहे. अहमदपूर येथील आमदार विनायक पाटील यांच्या घरासमोर अहमदपूर येथील कार्यकर्ते आंदोलन करणार असून त्याची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या आंदोलनात मराठा समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे अवाहनही करण्यात आलेले आहे.