मराठा आरक्षणासाठी आठ दिवसांत आठजणांनी मृत्यूला कवटाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, केज

एकीकडे राज्यभरात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा भडका उडाला असताना या आरक्षणासाठी आत्महत्येचे लोणही पसरत चालले आहे. गेल्या आठ दिवसांत आठजणांनी मृत्यूला कवटाळले असून आज बीड जिल्हय़ातील विडा येथील अभिजित बाळासाहेब देशमुख या उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाय बुलढाण्यातील नंदू बोरसे यांनी तर फुलंब्रीतील प्रदीप मस्के या विद्यार्थ्यानेही आत्महत्या केल्याची घटना आज घडली. एकाच दिवशी तिघाजणांनी आत्महत्या केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

उच्चशिक्षित असूनही नोकरी मिळत नाही, व्यवसायासाठी बँका कर्ज देत नाहीत आणि आजारपणावर होणारा खर्च यामुळे अभिजित हा प्रचंड अस्वस्थ होता. आज सकाळी घराशेजारच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला.  अभिजितच्या पश्चात आईवडील, लहान भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.

नंदू बोरसे यांचा गळफास

बुलढाणा जिल्हय़ात मोताळा तालुक्यातील उबळखेड येथील नंदू बोरसे (४७) यांनी आंदोलन करूनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे गळफास घेऊन जीवन संपवले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी अनेक मराठा क्रांती मोर्चांमध्ये सहभागी झालो परंतु आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.

गुणवत्ता असूनही प्रवेश मिळाला नाही

फुलंब्री तालुक्यातील  वडोद बाजार येथील प्रदीप हरी मस्के या विद्यार्थ्याला ७५ टक्के गुण मिळवूनही आयटीआयला प्रवेश मिळाला नाही. परिस्थिती हलाखीची असल्याने अकरावीला प्रवेश घेण्यासाठीही पैसे नसल्याने विमनस्क अवस्थेत प्रदीपने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आरक्षण नसल्यामुळेच प्रदीपवर आत्महत्या करण्याची वेळ आली असा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.

  • गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरीत उडी घेतली.
  • कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे यांनी विष घेतले.
  • नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील रोहन तोडकर या तरुणाने प्राणार्पण केले.
  • संभाजीनगरातील प्रमोद होरे-पाटील याने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.
  • नांदेड येथील कचरू दिगंबर कल्याणे यांनी मराठा आरक्षणासाठी जीवन संपवले.

मराठा आरक्षणासाठी औसा तालुक्यातील  टाका येथील आठ तरुणांनी तहसील कार्यालयात अंगाकर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी केळीच सर्कांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.