पक्षांनी आपली जागा आणि वास्तव्य बदलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय जोशी । नांदेड

वाढलेली सिमेंटची जंगले, अवैधरित्या होत असलेली वृक्षतोड आणि मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले मोबाईल टॉवर यामुळे परिस्थितीनुसार पक्षांनी आपले वास्तव्य बदलले असून, पर्यावरण ऱ्हासासाठी मानवच कारणीभूत आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी पक्षांची मदत होत असताना सोयीनुसार आता पक्षांनी आपली जागा आणि वास्तव्य बदलले आहे. पूर्वी बीज प्रसारणाचे (सीडबॉम्बींग) काम शासनाने लाखो रुपये खर्च करुन हाती घेतले असले तरी यापूर्वी हे काम पक्षांच्या मार्फतच केले जायचे, असे मत पक्ष संवर्धक सूर्यकांत खंदारे यांनी सामनाशी बोलाना व्यक्त केले.

आज आपल्या परिसरात चिमण्या, कावळे आदीसारखे पक्षी दिसून येत नाहीत. याची कारणमिमांसा केली तर हे पक्षी कुठेही मृत पावले नाहीत तर मानवाने निर्माण केलेल्या सिमेंट क्रॉक्रीटच्या जंगलामुळे अवैध वृक्षतोडीमुळे आणि पैश्याच्या हव्यासापोटी भर वस्त्यात बांधलेल्या मोबाईल टॉवरमुळे. या परिस्थितीमुळे आता पक्षांनी आपले वास्तव्य बदलले आहे. शहर व परिसरात उपलब्ध असलेली मोठी मोठी झाडे, तीही तोडण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या पध्दतीने युक्त्या करते. मात्र या झाडावरच या पक्षांचे वास्तव्य आता झालेले आहे. मोबाईल टॉवरमुळे चिमण्यांचा ऱ्हास झाला, असे अनेक तज्ज्ञ सांगतात. मात्र याचा पूर्ण अभ्यास केला तर परिस्थिती अशी आहे की, मानवांच्या वेगवेगळ्या आघातामुळे या पक्षांनी आता आपल्या जागा बदलल्या आहेत. या चिमण्या किंवा अन्य पक्षी मृत पावले नाहीत, हे मात्र नक्की, अशी भूमिकाही सुर्यकांत खंदारे यांनी व्यक्त केली.

वीस ते तीस वर्षापूर्वी घराघराच्या आसपास दिसणाऱ्या चिमण्यांनी आपला अधिवास बदलला आहे. शहरातील व परिसरातल्या वेगवेगळ्या मोठ्या झाडांचा अभ्यास केल्यानंतर अनेक पक्षी या झाडावर सायंकाळी गोंगाट करताना दिसून येतात. या झाडावर आजही त्यांचे वास्तव्य आहे. नांदेडचेच उदाहरण घ्यायचे असल्यास नांदेडच्या रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या दोन मोठ्या झाडांकडे आपण पाहिले तर सायंकाळी व सकाळी या झाडावर मोठ्या संख्येने चिमण्या, कावळे आणि पोपट दिसून येतात. दिवसभर हे कुठेही फिरत असले तरी रात्रीचा अधिवास ते या झाडावरच करतील. शहरातील भावसार चौक, तरोडा नाका, चैतन्यनगर, रेल्वेस्थानक, गोकुळनगर गेट या भागातील परिस्थितीचा अभ्यास केला तर तेथे या पक्षांचे मोठे वास्तव्य आहे. पक्षांच्या अधिवासावर झालेला हल्ला हा त्यासाठी कारणीभूत असून, मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड तसेच लावलेल्या झाडांचे योग्यरित्या वृक्ष संवर्धन न झाल्याने पक्षांनाच आपली जागा बदलावी लागली. एका पक्षाच्या जीवनावर तीस विविध प्रकारच्या परजातीवर तो पक्षी नियंत्रण करतो. बीज प्रसारणाचे मोठे काम पक्षीच करत होते, त्या भागातील इतर किटक पक्षी खात होते, त्यामुळे रोगराई थांबायची. त्या किटकामुळे मानवी जीवनावर होणारा परिणाम रोखला जायचा. मात्र मानवानेच निर्माण केलेले सिमेंटचे जंगल या पक्षांना आपला अधिवास बदलण्यासाठी कारणीभूत असल्याचे खंदारे यांनी म्हटले आहे.

अनेक मोठ्या झाडांना तोडण्यासाठी आपण विरोध केला, त्यासाठी न्यायालयातही गेलो, त्यामुळे शहरातील विविध भागातील मोठी झाडे यामुळे टिकून राहिली. मात्र यामुळे पक्षांचा किलबिलाट तेथे आजही कायम आहे. बीज प्रसारणासाठी शासनाला प्रयत्न करावे लागत आहेत. मात्र याचे कारण शोधल्यास वृक्षतोड, सिमेंटची जंगले हे त्यास कारणीभूत असून पक्षांनीच आता आपली जीवनशैली बदलल्याने गल्लीबोळात, वेगवेगळ्या नगरात पक्षांचा किलबिलाट थांबला आहे. मी पक्षांसाठी काही तरी करावे, असे प्रत्येकाला वाटते. यासाठी माकडांना वेगवेगळ्या खाद्यपदार्थ देणे, घरात चिमण्यासाठी व अन्य पक्षांसाठी धान्य आणि पाणी ठेवणे हे प्रकार होतात. त्यामुळे पक्षी ऐदी बनतो. केवळ ४५ अंश सेल्सियस तापमान असेल तरच अशी व्यवस्था मानवाने करायची आहे. त्यांच्यासाठी दानापाणी व्यवस्था करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. विदेशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये रात्रीच्यावेळी लाईट बंद केला जातो. तो पक्षी संवर्धनासाठी. मात्र हिंदुस्थानात हे होत नाही, हे दुर्दैव आहे. यामुळेच पक्षांचा ऱ्हास व त्यांचा मृत्यू होतो, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. वृक्ष संवर्धन हि आता काळाची गरज असून, उपलब्ध असलेली मोठी झाडे आता आपण दिर्घकाळपर्यंत जगवली पाहिजेत, हाच यावर उपाय असल्याचे खंदारे यांनी शेवटी सांगितले.