
सामना प्रतिनिधी। राहुरी
हुंड्यासाठी सासरची मंडळी छळ करत असल्याने बुधवारी एका विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना राहुरी येथील बारागाव नांदुर येथे घडली आहे. वैशाली गाडे असे तिचे नाव आहे. दरम्यान, सासरच्यांनी वैशालीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला असून या घटनेचा निषेध म्हणून तिच्या सासरच्या घराच्या दरवाजासमोरच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वैशालीच्या सासरच्यांनी तिच्यामागे ५ लाख रुपये हुंडा आणण्यासाठी तगादा लावला होता. वैशालीचा पती प्रकाश हा देखील रोज तिच्यावर माहेराहून पैसे आणण्यासाठी दबाव आणत होता. यावरुन वैशाली व तिच्या सासू सासरे यांच्यात वाद होत असे. वैशाली पैसे आणत नसल्याने तिला रोज मारझोड केली जात होती. रोजच्या त्रासाला कंटाळून वैशालीने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. याबद्दल तिच्या माहेरच्यांना कळताच त्यांनी बारागाव नांदुर येथे धाव घेतली. वैशालीने आत्महत्या केली नसुन पैशासाठी तिला सासरच्या लोकांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत संबंधीतावर कारवाई करा अन्यथा वैशालीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा आक्रमक पवित्रा वैशालीच्या माहेरच्या मंडळीने घेतला. यामुळे घटनास्थळी काहीकाळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दुपारी वैशालीचा पती प्रकाश बाबासाहेब गाडे, सासू मंगल गाडे, सासरा बाबासाहेब गाडे यांच्याविरुद्ध विवाहितेचा छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून दुपारी वैशालीचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी या घटनेचा निषेध म्हणून वैशालीवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
summary…women commit suicide in rahuri
























































