
सामना प्रतिनिधी । बर्मिंगहॅम
विराट कोहलीच्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. कर्णधार जो रूट व जॉनी बेअरस्टॉ या जोडीने तिसऱया विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केल्यानंतर विराट कोहलीच्या अचूक थ्रोवर जो रूट बाद झाला आणि ३ बाद २१६ या धावसंख्येवरून यजमान इंग्लंडची पहिल्या दिवसअखेरीस अवस्था ९ बाद २८५ धावा अशी झाली. जो रूटच्या ८० धावा, जॉनी बेअरस्टॉच्या ७० धावा आणि पहिल्या दिवसाच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने टिपलेले चार बळी बुधवारच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले.
Disaster! Joe Root gets run out. #ENGvIND pic.twitter.com/akl4l2RZXU
— Deepak Raj Verma (@iconicdeepak) August 1, 2018
दरम्यान, या आधी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर ऑलिस्टर कूक १३ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर जो रूट व किटन जेनिंग्स या जोडीने दुसऱया विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली. मोहम्मद शमीने किटन जेनिंग्सला ४२ धावांवर बाद करीत जोडी तोडली. याच मोहम्मद शमीने डेव्हिड मालनलाही आठ धावांवर पायचीत पकडून इंग्लंडला तिसरा धक्का दिला. बेन स्टोक्स (२१ धावा), जोस बटलर (०), अदिल रशीद (१३ धावा) व स्टुअर्ट ब्रॉड (१ धाव) यांनाही खेळपट्टीवर उभे राहून धावा करता आले नाही.
पुजाराला वगळले
हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाने पहिल्या कसोटीसाठी निवडलेल्या चमूत एक बदल आश्चर्यकारक ठरला. कसोटी स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱया चेतेश्वर पुजाराला टीम इंडियातून वगळण्यात आले होते. त्याच्याऐवजी तिसऱया क्रमांकावर लोकेश राहुलला संघात स्थान देण्यात आले. चेतेश्वर पुजाराच्या बॅटमधून परदेशात धावांचा पाऊस पडत नसून कौंटी क्रिकेटमध्येही तो अपयशी ठरला आहे. त्यामुळे टीम इंडियाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. तसेच डावखुरा युवा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला न घेता रविचंद्रन अश्विन या अनुभवी फिरकी गोलंदाजालाच अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले.


























































