
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
संगमेश्वर येथे जमिनीच्या व्यवहारातून मुंबईतील एका महिलेचा खून झाल्याची घटना बुधवारी घडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास करीत शिताफीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या व्यवहारात अजून कोण सहभागी आहेत आणि व्यवहारातील रक्कम कोणाकडे आहे याचा आम्ही शोध घेत असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
स्मिता चंद्रशेखर कुसुरकर, वय ५५ रा. लोअर परेल, मुंबई या गेले काही दिवस बेपत्ता होत्या. त्यांच्या नातेवाईकांनी मुंबई व परिसरामध्ये शोध घेतला परंतु त्या सापडल्या नव्हत्या. आपण रत्नागिरी येथे जात असल्याबाबत त्यांनी नातेवाईकांना सांगितले होते. संगमेश्वर येथे जमिनी संदर्भात त्यांनी व्यवहार केला असल्याचे नातेवाईकांनी संगमेश्वर पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय रत्नागिरी व पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे लेखी निवेदन देऊन सांगितले होते.
निवेदनासोबत त्यांनी संगमेश्वर तालुक्यातील उमरे गावातील जमिनी संदर्भातील सात बारा उतारे व बाळा वजुद्दीन मोडक रा.कसबा यांच्या नावाने जमीन खरेदी व्यवहाराची कागद पत्रांची प्रत जोडलेली होती.
निवेदनासोबत जोडलेल्या सातबारा उतारे, बॉडपेपरव्दारे करण्यात आलेला करार याची सत्यता पडताळण्यात आली. करार लिहून देणारे बाळा वजुद्दीन मोडक रा. कसबा हे हयात नसल्याचे व त्यांच्या कुटुंबियांनी असा कोणताही जमिनीचा व्यवहार केलेला नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. बेपत्ता स्मिता यांना जमीन खरेदी करून देतो असे सांगून बनावट नावे लेखी करार करून त्यांच्याकडून कोणीतरी २२ लाख ५० हजार रुपये स्वीकारलेले होते. हा बनाव आता उघडकीस येईल व स्वीकारण्यात आलेली २२ लाख ५० हजार रुपयांची रक्कम परत करावी लागेल, त्यापेक्षा त्यांचे तोंड कायमचेच बंद करण्याच्या इराद्याने त्यांना कोणीतरी संपविलेले असल्याचा पोलिसांना दाट संशय आला. त्यानुसार तपास सुरू झाला.
पोलीस तपासात श्रीकांत घडशी याचे नाव पुढे आले. म्हाबळे संगमेश्वर गावात त्याची चौकशी केली असता तो मुंबई येथे वास्तव्यास असल्याचे व त्याने २००९ मध्ये त्याच्या पत्नीला ठार मारुन तिला विहीरीमध्ये फेकून दिलेले असल्याचे समजले. या प्रकरणात श्रीकांत घडशी याचाच हात असल्याचा दाट संशय पोलिसांना होता. त्याला दिनांक २९ जुलै रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीत त्याने आपण स्मिता कुसुरकर यांना ठार मारल्याची कबुली देवून तिचे प्रेत म्हाबळे सडा येथील एका चीरे खाणीमध्ये पुरल्याचे सांगितले. आरोपीला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक प्रणय अशोक, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोहेकॉ संजय कांबळे, संदीप कोळंबेकर, दिनेश आखाडे, आशिष शेलार, विजय आंबेकर, मिलींद कदम, रमिज शेख, दत्ता कांबळे यांनी शिताफिने केलेल्या तपासाला अखेर यश आले.





























































